तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून आणखी एक कोटी जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

माओवाद्यांची आर्थिक कोंडी - परराज्यातील तेंदू कत्रांटदारांमध्ये धास्ती

माओवाद्यांची आर्थिक कोंडी - परराज्यातील तेंदू कत्रांटदारांमध्ये धास्ती
गडचिरोली - माओवाद्यांना पैसे देण्याच्या तयारीत असताना सोमवारी (ता. 22) मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून अटक केलेल्या तीन तेंदू कंत्राटदारांकडून मंगळवारी (ता. 23) रात्री आणखी 1 कोटी 1 लाख जप्त केले. या कारवाईमुळे परराज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदर चांगलेच धास्तावले असून माओवाद्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाने दोन दिवसांपूर्वी आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला, रवी मलय्या तनकम व नागराज समय्या पुट्टा या तीन तेंदू कंत्राटदारांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून नक्षल पत्रक व 75 लाख रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर अधिक चौकशीदरम्यान तिघांकडून आणखी 1 कोटी 1 लाख जप्त करण्यात आले. ही रक्कम बोटलाचेरू येथे लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या कंत्राटदारांकडून आतापर्यंत 1 कोटी 76 लाख रुपये जप्त करण्यात आले.

केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर माओवाद्यांनी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मोठी खटाटोप केली, समर्थकांवर दबाव टाकून त्यांच्या बॅंक खात्यातही जुन्या नोटा टाकण्यासाठी प्रयत्न केले तर काही व्यापाऱ्यांनाही कमिशनवर नोटांचा पुरवठा केल्याची बाब समोर आल्याने गृहखाते यावर नजर ठेवून होते. माओवाद्यांना नोटाबंदीची झळ बसल्याने यंदाच्या तेंदूपत्ता हंगामावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलासह पोलिसांना दिली होती. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तेंदूपत्ता हंगामात माओवाद्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अंतर्गत गडचिरोली पोलिसांनी विशेष पथक तैनात केले होते. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेच आलापल्लीत तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, नक्षल कारवायांवर परिणाम होईल, असे जिल्हा पोलिस उपअधीक्षक ए. राजा यांनी सांगितले.