दत्तक दिलेला माझा मुलगा मला परत द्या

दत्तक दिलेला माझा मुलगा मला परत द्या

मूळ आईची धाव; इक्‍बालच्या ताब्याचा प्रश्‍न कुटुंब न्यायालयातून उच्च न्यायालयापर्यंत

नागपूर - दत्तक दिलेला मुलगा परत देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका एका आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून पालनपोषण करणाऱ्या आईकडेच मुलाचा ताबा कायम ठेवावा की मूळ आईच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत तिचे मातृत्व तिला परत द्यावे का, असा प्रश्‍न न्यायपीठापुढे निर्माण झाला आहे. 

दत्तक दिलेला मुलगा परत मागण्याचा हा अतिदुर्मिळ प्रसंग असून, यामुळे एका मुलाच्या ताब्यासाठी दोन मातांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

इक्‍बाल (नाव बदललेले) या अडीच वर्षांच्या मुलासाठी सुरू असलेला हा संघर्ष फारुक आणि फातिमा यांच्या प्रेमकथेतून सुरू झाला. फारुक आणि फातिमा यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. भावी आयुष्याच्या स्वप्ने रंगवितानाच लग्नाच्या आणाभाका वगैरे घेण्यात आल्या. जुळलेल्या मनांसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. विवाहापूर्वीच झालेल्या संबंधातून इक्‍बालचा जन्म झाला. पारंपरिक आणि रुढीप्रिय फातिमाच्या कुटुंबीयांसाठी हा फार मोठा धक्का होता. मात्र, त्यातून कसेबसे सावरत तिच्या पालकांनी फारुककडे लग्न करण्यासाठी आग्रह धरला असता त्याने नकार दिला. यामुळे फातिमा प्रचंड नैराश्‍यात गेली. उतारवयात मुलीमुळे होणारा अपमान सहन करावा की विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या नातवाचा सांभाळ करावा, या द्विधास्थितीत असलेल्या फातिमाच्या वडिलांनी इक्‍बाल याला एका निपुत्रिक डॉक्‍टर दाम्पत्याला दत्तक दिले. 

समाजाच्या दृष्टीने अनौरस असलेल्या चिमुकल्या इक्‍बालच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सकाळ होत असतानाच पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात वादळ आले आहे. मुख्य म्हणजे त्याच्या आयुष्यात वादळ आणणारे त्याचे मूळ माता-पिता आहेत. अडीच वर्षांनंतर फारुक याने फातिमासोबत विवाह केला असून, तो मुलाला आपलेसे करण्यास तयार झाला आहे. यामुळे फातिमाने ‘माझा मुलगा मला परत द्या’, अशी विनवणी न्यायालयाला केली आहे. 
इक्‍बालच्या ताब्याचा प्रश्‍न कुटुंब न्यायालयातून उच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. अत्यंत नाट्यमय अशा या याचिकेवरील निर्णय दत्तक दिलेल्या मुलाचा ताबा परत मूळ आईकडे द्यावा की तो दत्तक घेतलेल्या पालकांकडेच कायम ठेवावा हे ठरवणार आहे. 

इक्‍बालचे आजोबाही प्रतिवादी
या संपूर्ण प्रकरणात स्वत:चे मुलीचे आणि नातवाचे आयुष्य व्यवस्थित राहणाच्या दृष्टीने इक्‍बाल याला परस्पर दत्तक देणाऱ्या आजोबांना फातिमाने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. आईच्या परवानगीशिवाय इक्‍बालला दत्तक कसे काय दिले, असा प्रश्‍न तिने याचिकेत विचारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com