गोंदियात ‘शून्य माता व बालमृत्यू’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

गोंदिया - आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गोंदियात गणराज्य दिनी २६ जानेवारीपासून नावीन्यपूर्ण ‘शून्य माता व बालमृत्यू अभियान’ जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

गोंदिया - आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गोंदियात गणराज्य दिनी २६ जानेवारीपासून नावीन्यपूर्ण ‘शून्य माता व बालमृत्यू अभियान’ जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

जिल्ह्यात जून २०१७ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वयीन झाले. जिल्हा मुख्यालयी बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालय हे २०० बेडयुक्त सुसज्ज प्रसूती रुग्णालय आहे. याच रुग्णालयात सुसज्ज ५० बेडयुक्त नवजात शिशूसाठी अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे ‘कोवळी पानगळ’ रोखण्यासाठी मदत झाली. तसेच १२ ग्रामीण रुग्णालयातून प्रथम सेवा संदर्भ केंद्र पुनरुज्जीवित करण्यासाठी जिल्हाधिकारी काळे यांनी पुढाकार घेतला. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षित प्रसूतीतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा २४ तास उपलब्ध ठेवण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना केली. सुरक्षित प्रसूती झालीच तरच १०० टक्‍के ‘शून्य माता मृत्यू’ अभियान यशस्वी होईल, हा या अभियानाचा मूलमंत्र जिल्हाधिकारी काळे यांनी दिला.

जिल्ह्यात सध्या मानवविकास मिशनअंतर्गत प्रत्येक आठवड्याला अतिजोखमीच्या गर्भवतींचे विशेष शिबिर प्रसूतीतज्ज्ञांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर बोलावून आयोजित करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या २० ते २५ गावांतील गर्भवती महिलांना खास रुग्णवाहिका पाठवून मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात आणून प्रसूती तज्ज्ञामार्फत वैद्यकीय तपासणी सल्ला, उपचार व कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येते. 

गर्भवतीच्या घरच्या पुरुष मंडळींना आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यांबद्दल जशी उत्सुकता असते. तसेच गर्भवतीच्या आरोग्याची चिंतादेखील असते. त्यामुळे त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेऊन त्यांना गर्भवतीच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण गर्भवतीचे वजन, गर्भवतीचा रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय आजार याबाबत सविस्तर माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात येत आहे. गर्भवतीला काही अचानक त्रास झाला किंवा धोक्‍याचे लक्षणे कशी ओळखावी, रुग्णालयात भरती केव्हा करावे आदी समुपदेशन डॉक्‍टर करीत आहे. याला पुरुष मंडळीकडून खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गर्भवती महिलेचे हिमोग्लोबीनचे प्रमाण व रक्तदाबाची माहिती दर महिन्याला एक पत्रकाद्वारे संबंधित महिलेच्या कुटुंबाला देण्यात येते.

सोशल मीडियाची साथ
या अभियानाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. व्हॉटस्‌ॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून ‘शून्य माता व बाल मृत्यू’ हा ग्रुप स्थापन करून त्यात सर्व जिल्हास्तरावरील प्रसूतीतज्ज्ञ, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सक्रिय करण्यात आले. जिल्हाधिकारी काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार सदर ग्रुपच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवून मार्गदर्शन करतात. ‘प्रत्येक जीव महत्त्वाचा’ हे ध्येय प्रेरित करीत आहेत. यामुळे सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळातच ‘मातामृत्यू शून्य’ करण्यासाठी यश आले.

Web Title: Gondia 'zero maternal and child mortality' campaign