इंधन दरवाढीने चाके रुतली; जिल्ह्यातील ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अडचणीत

विवेक मेतकर 
गुरुवार, 24 मे 2018

वाढत्या इंधन दरवाढीचा ट्रकच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन व्यवसाय कमी होत असल्याने वाहतुकदारांच्या गाड्यांची चाके रुतली आहेत.

अकोला - दररोज वाढत जाणाऱ्या इंधन दरांच्या तुलनेत मालवाहतुकीच्या फेरीचा दर वाढत नाही, त्यामुळे वाहतूकदारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. सहा महिन्यांपूर्वीचे दर आजही कायम आहे. वाढत्या इंधन दरवाढीचा ट्रकच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन व्यवसाय कमी होत असल्याने वाहतुकदारांच्या गाड्यांची चाके रुतली आहेत. वाहतूक फेऱ्यांचे दर वाढत नसले तरी इंधन दरवाढीच्या नावाखाली महागाई वाढण्याची शक्‍यता यामुळे बळावत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत पेट्रोलचा दर 85 तर डिझेलही 74 वर पोचले आहे. त्यामुळे सामान्य वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • जिल्ह्यात शंभर वाहतूकदार -

अकोला शहरात जवळपास शंभर वाहतूकदार आहेत. या वाहतूकदारांच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत तसेच राज्यातील मोठ्या शहरांमध्ये, राज्याबाहेर जवळपास सर्वच प्रांतांमध्ये सुमारे पाचशे ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक होत असते. तर परराज्यातूनही येणाऱ्या ट्रकची संख्या दोनशे प्रतिदिन एवढी आहे.

  • या मालाची वाहतूक सर्वाधिक -

शहरातून पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या, इरिगेशनचे साहित्य, चटई, डाळी, खाद्यतेल या वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसभरात शहरासह जिल्ह्यात ट्रान्स्पोर्ट व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. त्यावर शंभर वाहतूकदार, त्यांच्याकडील कर्मचारी व हमाल असा 10 हजारांवर व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो.

  • दरवाढीच्या नावावर -

इंधन दरवाढीचा थेट वाहतुकीच्या दरावर परिणाम झालेला नसला तरी वाहतूकदारांचा खर्च वाढला आहे, हे निश्‍चित. मात्र, इंधन दरवाढीचे नाव वापरून बाजारपेठेतील सर्वच वस्तूंचे दर वाढविण्यास व्यावसायिक मोकाट असतात. जर वाहतूक फेऱ्यांचे दर वाढत नसतील तर बाजारातील वस्तूंचे दर का वाढविले जातात? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो.

इंधन दरवाढीने वाहतूकीचा खर्च वाढला आहे. मात्र, मालवाहतुकीच्या फेऱ्यांचा दर वाढलेला नाही. मोठ्या शहरांमधील व अन्य ठिकाणच्या मालवाहतुकीचे फेरीनिहाय दर वर्षभरापूर्वी जेवढे होते, तेवढेच आहेत. इंधनाचे दर कमी झाल्यास थोडा दिलासा मिळू शकेल, त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. - नजमुद्दीन चव्हाण, अकोला गुड्स गॅरेज, अकोला

Web Title: goods traffic business face loss due to fuel price hike