गारपीट, अवकाळीचा वऱ्हाडला तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

गहू, कांदा, हरभरा, संत्र्याला फटका, वाशीम जिल्ह्यात वीज कोसळून शेतकरी जखमी

गहू, कांदा, हरभरा, संत्र्याला फटका, वाशीम जिल्ह्यात वीज कोसळून शेतकरी जखमी
अकोला - वऱ्हाडात आज दुपारी 2.30 ते 4 च्या सुमारास ठिकठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्‍यांत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे बीजोत्पादनाचा कांदा, काढणीला आलेला गहू आणि संत्री बागांना फटका बसला. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, मेहकर आणि खामगाव तालुक्‍यातील काही गावांमध्ये तुरळक पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्‍यातील शेलूबाजार येथे गारपीट झाली, तर वाशीम तालुक्‍यात पाऊस पडला. मानोरा तालुक्‍यातील विठोली येथे वीज कोसळून शेतकरी जखमी झाला.

दुपारी दोन वाजल्यापासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन वादळासह पावसाला सुरवात झाली. पातूर तालुक्‍यातील आगीखेड, भंडारज व इतर भागात मध्यम स्वरूपाच्या गारा पडल्या. अकोला शहर व परिसरातही हलक्‍या सरी कोसळल्या. या गारपीट व पावसामुळे पातूर तालुक्‍यात गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. येथील कोठारी खुर्द येथे संत्रा बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी गव्हाचे काढणीला आलेले पीक अक्षरशः झोपल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. बुलडाणा तालुक्‍यासह जिल्ह्यात काही ठिकाणी गहू, हरभरा व कांदा पिकाचे अल्प प्रमाणात नुकसान झाले.

अकोला जिल्ह्यात सुमारे हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन केले जात आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे पीक जमीनदोस्त झाले. सध्या कांद्याच्या गेंदामध्ये कुठे बी परिपक्व होत होते, तर कुठे बी धरण्याची अवस्था सुरू झाली होती. एकरी चार ते पाच क्विंटल बी होत असते.
- नामदेवराव अढाऊ, कांदा बीजोत्पादक शेतकरी, देऊळगाव ता. पातूर जि. अकोला