राजीवनगरात दारूबंदीसाठी आंदोलन पेटले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

हिंगणा - राजीवनगर बसस्थानकाजवळील देशी दारू दुकानामुळे अपघातात निष्पाप लोकांचा बळी जात आहे. यामुळे देशी दारूचे दुकान शासनाने बंद करावे, यासाठी ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेच्या नेतृत्वात राजीवनगरातील महिलांनी ‘एल्गार’ पुकारला. अपघातानंतर आंदोलन करणाऱ्या महिलांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नोटीस बजावून पोलिसांनी दडपशाहीचे धोरण सुरू केल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

हिंगणा - राजीवनगर बसस्थानकाजवळील देशी दारू दुकानामुळे अपघातात निष्पाप लोकांचा बळी जात आहे. यामुळे देशी दारूचे दुकान शासनाने बंद करावे, यासाठी ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेच्या नेतृत्वात राजीवनगरातील महिलांनी ‘एल्गार’ पुकारला. अपघातानंतर आंदोलन करणाऱ्या महिलांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नोटीस बजावून पोलिसांनी दडपशाहीचे धोरण सुरू केल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

१४ सप्टेंबर रोजी राजीवनगर बसस्थानकासमोरील देशी दारू दुकानातील मद्यधुंद अवस्थेत एक जण रस्त्यावर आला. याला वाचविण्यासाठी ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. महाजनवाडी निवासी स्वीटी हर्षल लोखंडे (वय २२) या खाली कोसळल्या.

दरम्यान, भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर असलेले त्यांचे पती हर्षल लोखंडे गंभीर जखमी झाले. 
अपघातानंतर ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेच्या नेतृत्वात महिलांनी चक्काजाम आंदोलन करून देशी दारूभट्टी बंद करावी, अशी मागणी रेटत आंदोलन केले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील व एमआयडीसीचे ठाणेदार सुनील महाडिक पोलिस ताफ्यासह पोहोचले. यानंतर पोलिसांनी कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी महिलांना संरक्षण देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले. यामुळे आंदोलनकर्त्या महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. 

राजीवनगरातील महिलांनी आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची शुक्रवारी (ता. १५) भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात महिलांनी मागील आठ वर्षांपासून देशी दारू दुकान बसस्थानक व बुद्धविहाराजवळ सुरू आहे. यामुळे राजीवनगरातील शाळकरी मुले, महिला व इतरांना दारुड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. आतापर्यंत राजीवनगरात अपघातांमध्ये पाच जणांचे बळी गेले. ही वस्तुस्थिती असल्याने राजीवनगरातील सर्व जनतेचा या दारू दुकानाला विरोध आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने ही दारूभट्टी बंद करून परिसरातील नागरिकांना भययुक्त वातावरणातून मुक्त करावे, अशी मागणी रेटली.
मागील अनेक वर्षांपासून ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेच्या पदाधिकारी माधुरी निकुरे राजीवनगर दारूमुक्त करावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र आश्‍वासनापलीकडे काहीही हाती लागले नाही. जोपर्यंत ही दारूभट्टी बंद होणार नाही, तोपर्यंत महिलांचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशाराही निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांची नोटीस
राजीवनगर अपघातानंतर ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेने देशी दारू दुकान बंद करावे, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केले. अपघातात एका निष्पाप महिलेचा बळी गेला. याचे पोलिस प्रशासनाला काहीही देणेघेणे नाही. सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला आंदोलन कार्यकर्त्यांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. राजीवनगर पोलिस चौकीचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. डेहनकर यांनी आंदोलनकर्त्या महिलांना नोटीस बजावून पोलिस चौकीत रविवारी (ता. १७) बोलावले आहे. राजीवनगर परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असताना डेहनकर यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मात्र आंदोलनकर्त्या महिलांना गुन्हेगारासारख्या नोटिशी बजावून मोठे तीर मारले आहेत, असे महिलांनी सांगितले.

पोलिस उपायुक्त महिलांना न्याय देणार का?
राजीवनगरात देशी दारू दुकान बंद करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आंदोलनस्थळी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी भेट दिली. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्‍न असल्याने महिलांनी आंदोलनात पुढाकार घेतला, यात गैर काय? पोलिस महिलांवर दडपशाहीची भूमिका अवलंबीत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे पोलिस उपायुक्तांनीच या प्रकरणात चौकशी करून महिलांना नोटीस बजावणारे सहायक पोलिस निरीक्षक डेहनकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटनेच्या पदाधिकारी माधुरी निकुरे यांनी केली आहे.