संसार मोडतानाही 'मियां बिवी राजी'! 

divorce
divorce

नागपूर : प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी "मियां बिवी राजी तो क्‍या करेगा काझी' ही म्हण प्रचलित आहे. पण, आता संसार मोडतानाही या म्हणीला साजेसे वर्तन पती-पत्नी करीत आहेत. "म्युच्युअल डिव्होर्स' अर्थात परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, यात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा तिसरा क्रमांक आहे. 

घटस्फोटांचे वाढते प्रमाण विवाहसंस्थेसाठी धोकादायक आहेच. पण, समुपदेशनाचा "स्पीड ब्रेकर' टाळून सहमतीने घटस्फोट घेण्याचा प्रकार त्याहीपेक्षा धोकादायक ठरत आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात हा प्रकार मुळीच नवा नसून हाच ट्रेंड आता पुणे आणि नागपुरात स्थिरावतोय. गेल्या दोन वर्षांतील मुंबईतील प्रकरणांची संख्या नागपूर आणि पुण्यातील एकूण प्रकरणांपेक्षा दुप्पट असल्याचे आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे प्रकरण दाखल झाल्यावर दोघेही थेट पहिल्या आणि शेवटच्या दिवशी स्वाक्षरी करायला येतात. एकत्र नांदताना नसेल, तेवढे सामंजस्य घटस्फोट घेताना दाखविले जाते, असे निरीक्षण समुपदेशक नोंदवितात. घटस्फोट मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या दीड वर्षामध्ये दोघेही वेगळे राहून अतिशय आनंदाने आपापले आयुष्य जगतात. घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेणे, ही त्यांच्यासाठी केवळ औपचारिक बाब असते. सामानांची, संपत्तीची देवाणघेवाण, मध्यस्थींची बैठक आदी सोपस्कार घरीच आटोपलेले असतात. त्यामुळे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कुटुंबातील ज्येष्ठांसाठीही वेळेचा अपव्यय ठरतो, हे वास्तव नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ विवाह समुपदेशक डॉ. शेखर पांडे यांनी "सकाळ'कडे मांडले.

पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक सुदाम गायके आणि मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक बापूसाहेब सोनावणे यांनी गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीच्या माध्यमातून भविष्यातील चिंता व्यक्त केली. 

आकडे"मोड'... 
(2016 व 2017 मधील म्युच्युअल डिव्होर्स) 
मुंबई ः 5 हजार 949 
पुणे ः 1 हजार 908 
नागपूर ः 1 हजार 526 

सक्‍सेस रेट एक टक्का 
सहमतीने घटस्फोट घेताना पती-पत्नी समुपदेशकाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात, त्यांच्यात धीरच नसतो. आमच्यादृष्टीने हीच विवाहसंस्थेला घातक ठरणारी सर्वांत मोठी बाब आहे. परंतु, या प्रकरणांमध्ये ज्याप्रमाणे सक्‍सेस रेट केवळ एक टक्का आहे, त्याप्रमाणे घटस्फोट झाल्यावर पश्‍चातापाचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. संसार टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा संसार मोडण्यासाठी प्रयत्न करणारे कौटुंबिक मध्यस्थही यासाठी तेवढेच कारणीभूत आहेत. 
- डॉ. शेखर पांडे, ज्येष्ठ विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, नागपूर 

...म्हणून वाढतेय प्रमाण 
सहमतीने घटस्फोट घेणारी जवळपास शंभर टक्के जोडपी उच्चशिक्षित व गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करणारी आहेत. कायद्याच्या संदर्भातील जागरूकता, आर्थिक स्वातंत्र्य तसेच पुनर्विवाहाच्या संधी मेट्रोसिटीजमध्ये अधिक आहे. त्यामुळे अशापद्धतीच्या घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ट्रेंड आता मोठ्या शहरांतून छोट्या शहरांकडे वळू लागला आहे. 
- जगन्नाथ कांबळे, ज्येष्ठ विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई 

आणि शेवटी पश्‍चाताप... 
नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयातील एका प्रकरणाबद्दल डॉ. शेखर पांडे सांगतात, "एका मोठ्या कंपनीत एकत्र काम करताना दोघांची ओळख होते. तो नागपूरचा, ती वर्ध्याची. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर होते. आंतरजातीय विवाह होतो. काही वर्षे दुसऱ्या शहरात नोकरी करून अपत्य झाल्यावर नागपुरात परततात. सासू-सुनेत भांडणं सुरू होतात. यातून नवरा-बायकोत वाद होऊ लागतात. दोन्ही कुटुंबे कुठलाही विचार न करता घाईघाईत घटस्फोटासाठी प्रकरण दाखल करतात. दरम्यान, वाटाघाटी वगैरे घरीच ठरवून घेतात. वर्षभरापासून वेगळेच राहतोय, हे दाखवून ताबडतोब घटस्फोट मिळवतात. आता लहान मुलीच्या निमित्ताने भेट होते तेव्हा पश्‍चातापाचे भाव दोघांच्याही चेहऱ्यावर दिसतात.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com