इनडोअर स्टेडियमच्या देखभालीचा मार्ग मोकळा

इनडोअर स्टेडियमच्या देखभालीचा मार्ग मोकळा

शासनाने दिले सव्वादोन कोटी रुपये - अग्निशमन व वातानुकूलित यंत्राची होणार दुरुस्ती 
नागपूर - कोट्यवधी रुपये खर्च करून एखादी वास्तू उभारण्याचे काम सोपे असते. मात्र, त्याची वर्षभर देखभाल (मेंटेनन्स) करणे तितकेच अवघड. मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहाची कहाणी अशीच काहीशी आहे. सभागृहाच्या देखभालीसाठी संकुल समितीला इकडेतिकडे हात पसरावे लागत होते. मात्र, आता शासनाकडून मोठी रक्‍कम मिळाल्याने ‘मेंटेनन्स’ची तात्पुरती का होईना सोय झाली आहे. 

क्रीडासंकुलातील इनडोअर सभागृह २०१२ मध्ये पूर्ण झाले. त्यावर जवळपास १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तत्कालीन प्रभारी उपसंचालक विजय संतान यांनी या सभागृहाचा खेळाडूंसाठी सदुपयोग व्हावा, यासाठी थोड्याफार ‘ॲक्‍टिव्हिटी’ सुरू केल्यात. त्यानंतर हीच परंपरा सध्याचे उपसंचालक सुभाष रेवतकर यांनीही कायम ठेवत संकुलाच्या ‘मेंटेनन्स’साठी पैसा उभारणे सुरू केले. मात्र, नियमित कार्यक्रमांमुळे सभागृहाच्या वातानुकूलित व अग्निशमन यंत्र तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मरवर अधिक ताण पडत आहे. याचा फटका गतवर्षी २९ जुलैला सभागृहात आयोजित व्याघ्रदिन कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक मंत्री व आमदारांना बसला होता. कार्यक्रमादरम्यान एसी यंत्रणा बंद पडल्याने सर्वच जण घामाघूम झाले होते. 

नेत्यांच्या नाराजीनंतर यंत्रणा दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुदानासाठी प्रयत्न करण्यात आल्याने शासनाने तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. या पैशातून एसी यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था व विद्युत ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती तसेच वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या ६ एप्रिलला विभागीय आयुक्‍त अनुपकुमार यांच्या मार्गदर्शनात बैठक होणार असून, त्यात निधी खर्च करण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेवतकर यांनी सांगितले.  
    
वर्षभरात जमा झाले चार कोटी
विभागीय क्रीडासंकुल समितीने गेल्या वर्षभरात विविध माध्यमांतून जवळपास चार कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात बॅडमिंटन, क्रिकेट, मुष्टियुद्ध, योगा, जिम्नॅस्टिक्‍स, ज्यूदो, कराटे, जिमच्या सदस्य शुल्काचा प्रमुख वाटा आहे. याशिवाय इनडोअर सभागृहात वर्षभर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व कार्यशाळा तसेच परिसरातील होणाऱ्या प्रदर्शन, मेळावे व अन्य समारंभाद्वारेही मोठी रक्‍कम गोळा झाली आहे. या पैशाचा सदुपयोग भविष्यात इनडोअर सभागृह व सिंथेटिक ट्रॅकसाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रेवतकर यांनी दिली.

सिंथेटिक ट्रॅकचे काम थंडावणार
निर्धारित कार्यक्रमानुसार, सिंथेटिक ट्रॅक या महिन्याअखेरीस पूर्णत्वास जाणार होता. परंतु, ट्रॅकच्या मधोमध असलेल्या फुटबॉल मैदानावरील लॉनच्या ‘लेव्हलिंग’ला उशीर होत असल्यामुळे ट्रॅकच्या तयारीवरही त्याचा परिणाम होत आहे. आतापर्यंत वेगाने झालेल्या ट्रॅकचे काम संथगतीने सुरू आहे. यासंदर्भात रेवतकर म्हणाले, बर्म्यूडा लॉन असलेल्या मैदानावर भरपूर पाणी टाकून ते आणखी हिरवेगार करण्यात येणार आहे. परंतु, उन्हाळामुळे येथील पाणी कमी पडत आहे. त्यामुळे बाहेरून दररोज दोनशे टॅंकर पाणी आणून त्यावर टाकण्यात येत आहे. भरपूर गवत उगवल्यानंतर त्यावर दोन-तीन दिवस जड रोलर चालविले जाईल आणि गवत कापण्यात येईल. त्यानंतरच ट्रॅकवर अंतिम आच्छादन (लेअर) टाकून मार्किंग केले जाईल. या कामासाठी विदेशातून आणखी एक तज्ज्ञ पथक लवकरच नागपुरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ट्रॅकवर स्पर्धा घेण्यासंदर्भात नागपूर जिल्हा ॲथलेटिक्‍स संघटनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे रेवतकर यांनी सांगितले. एखाद्या मोठ्या स्पर्धेने ट्रॅकचे उद्‌घाटन करण्याचा मनोदय  उपसंचालकांनी यापूर्वीच व्यक्‍त केला होता. या ट्रॅकचे दर दिवसाचे भाडे माफक अर्थात १५ ते २० हजार रुपये राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com