भाज्यांचे भाव वाढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

एक किलो सिमला मिरची, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीसाठी 60 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. शहरात आजूबाजूच्या गावातून भाजीची आवक सुरू असली तरी ती तुरळक असल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले

नागपूर - वाढत्या उन्हामुळे आवक घटल्याने शहरात भाज्यांच्या दरात वाढ झाली. सर्व भाज्या सरासरी 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. मेथी 80 रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, टमाटर सर्वांत कमी म्हणजे 20 रुपये किलो आहेत.
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत नागपूर जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक एकदम कमी झाली. गेल्या आठवड्यात नाशिकहूनही आवक कमी झाली.

याचा फटका फळभाज्या आणि पालेभाज्यांना बसला. नाशिककडून येणारी भाज्यांची आवक उन्हामुळे मंदावली आहे. यामुळे हिरवी मिरची, फ्लॉवर, सिमला मिरची, फणस, मेथीची भाजी, चवळी, गवाराच्या शेंगा, कारले, पडवळ, ढेमस, भेंडीचे दर वधारले आहेत. एक किलो सिमला मिरची, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीसाठी 60 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. शहरात आजूबाजूच्या गावातून भाजीची आवक सुरू असली तरी ती तुरळक असल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.

भाजीचे - ठोक बाजारातील दर (प्रतिकिलो)
वांगे - 15 रुपये
फुलकोबी - 15 रुपये
पानकोबी - 15 रुपये
हिरवी मिरची ः 20 रुपये
कोथिंबीर - 30 रुपये
चवळीची भाजी ः 40 रुपये
गवार शेंगा ः 30 रुपये
कारले ः 40 रुपये
भेंडी - 20 रुपये
तोंडले - 15 रुपये
पडवळ - 30 रुपये
ढेमस - 40 रुपये
सिमला मिरची ः 20 रुपये
फणस - 25 रुपये
कच्चे आंबे - 20 रुपये
मेथीची भाजी ः 50 रुपये

किरकोळ बाजारात गोकुळपेठ, खामला येथे भाज्या गेल्या आठवड्यात 40 ते 50 रुपये किलो होत्या. शुक्रवारपासून किरकोळ बाजारात दर 60 ते 80 रुपयांवर आले. काही ठिकाणी 40 रुपये किलो असलेल्या भाज्यांचे भाव 60 ते 80 रुपये तर, पालेभाज्यांचे भाव 40 रुपये किलोवर आहेत. भाजीविक्री गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने घटल्याने भाव कडाडले आहेत.
- संताजी शेंडे, भाजीविक्रेते

यंदा आजूबाजूच्या खेड्यांतून भाज्यांची आवक सुरू असली तरी दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पाण्याची टंचाई असल्याने भाज्यांचे उत्पादन घटले. परिणामी भाववाढ झाली. जुलै महिन्यापर्यंत भाजीचे भाव चढेच राहण्याची शक्‍यता आहे. घाऊक बाजारात भावात किंचित वाढ झालेली असली तरी किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट दराने विकल्या जात आहेत.
- राम महाजन, भाजी विक्रेते (ठोक)

Web Title: inflation in vidarbha