आयटी तक्रारींचे एकाच छताखाली निवारण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नागपूर - सध्या ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडियाचा वापर आणि त्यांच्या दैनंदिन कामाकाजासाठी इंटरनेटचा वापर होत आहे. त्यातच फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तक्रारदाराला एकाच छताखाली मदत मिळावी, यासाठी सायबर तक्रार निवारण केंद्र (सी-थ्री) सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी दिली.

शनिवारी गुन्हे शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुन्हे शाखा कार्यालयात सायबर तक्रार निवारण सेलचे त्यांनी उद्‌घाटन केले. या ठिकाणी सायबर गुन्ह्यांसंबधी तक्रार स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

नवनवीन तंत्रज्ञान व सायबर गुन्हे तपासाच्या कार्यप्रणाली गुंतागुंतीची असल्यामुळे प्रकरण उघडकीस आणणे आणि तपास करणे गैरसोयीचे आहे. नागरिकांनी पोलिस ठाण्यास सायबर गुन्ह्यांसंबंधी तक्रारी देणे व पुन्हा तेथून तांत्रिक मदतीकरिता ती माहिती सायबर सेल येथे पाठविणे, यामुळे बराच वेळ जातो. त्यामुळे सायबर गुन्ह्याचा तपास व प्रक्रियेचे ज्ञान असणाऱ्या तांत्रिक विभागात एकाच ठिकाणी अशा सायबर गुन्ह्यांची तक्रार घेऊन त्यात योग्य ती तांत्रिक प्रक्रिया करून सदर माहिती पोलिस ठाण्यास दिल्यास त्यांना आरोपींना पकडणे तसेच गुन्हा उघडकीस आणणे सोयीचे होईल. याकरिता एकाच छताखाली सर्व माहिती मिळण्यासाठी हा सेल स्थापन करण्यात आला आहे.

सायबर गुन्ह्याबाबत आलेल्या सर्व तक्रारी अर्ज तक्रारी अर्ज स्वीकारणे तसेच सॉफ्टवेअर माध्यमातून आलेल्या अर्जाची नोंद करणे आणि अर्जदारास पोहोच देणे, अर्ज हा कोणत्या स्वरूपाचा आहे, याची सायबर कम्प्लेंट सेल प्रभारी अधिकारी यांनी खात्री करून संबंधितांकडे चौकशीसाठी अर्ज देण्यात येईल. या प्रकरणात महिला व युवतींची वैयक्तिक माहिती तसेच त्यांचा अपमान होईल, अशा पद्धतीची माहिती विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. या प्रकारात संबंधित पीडिताची इतकी बदनामी केली जाते की, पीडित व्यक्ती एकतर आत्महत्या करतो किंवा वैफल्यग्रस्त होतो. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थिनी अशा प्रकारास जास्त बळी पडतात. पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्‍त शिवाजी बोडखे, डीसीपी नीलेश भरणे, डीसीपी श्‍वेता खेडकर, एसीपी अश्विनी पाटील होत्या.