वकील महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - खोट्या तक्रारी देऊन खंडणी वसूल करणे तसेच घराजवळील दुकानदार, शेजाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या ॲड. राजेशकुमारी उर्फ राजश्री विश्‍वनंदनस्वरूप टंडन (५३, रा. चौधरी ले-आउट) यांची दहावीतील विद्यार्थ्याने हत्या केली. सेमिनरी हिल्स भागातील मोंटेक्‍स फोटो स्टुडिओमध्ये घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

नागपूर - खोट्या तक्रारी देऊन खंडणी वसूल करणे तसेच घराजवळील दुकानदार, शेजाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या ॲड. राजेशकुमारी उर्फ राजश्री विश्‍वनंदनस्वरूप टंडन (५३, रा. चौधरी ले-आउट) यांची दहावीतील विद्यार्थ्याने हत्या केली. सेमिनरी हिल्स भागातील मोंटेक्‍स फोटो स्टुडिओमध्ये घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपी टंडन यांच्या शेजारी राहायचा. साधारणत: दोन वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलाला पोलिसांनी तडीपार केले होते. टंडन यांनी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे वडिलांना तडीपार केल्याचे मुलाचे म्हणणे होते. यावरून दोघांमध्ये भांडणदेखील व्हायचे. बरेचदा ‘तेरा बाप क्रिमिनल हैं’ अशा शब्दांमध्ये ॲड. टंडन मुलाला डिवचायच्या. शुक्रवारी सायंकाळी 

७ ते ७.३० वाजतादरम्यान आरोपीचे आजोबा आणि ॲड. टंडन यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी मुलाला टंडन यांनी कानाखाली लगावली. याचा राग आरोपीच्या मनात होता. औषधी खरेदी करून ॲड. टंडन घरी जात असताना आरोपीने त्यांना अडविले आणि चाकू उगारला. यामुळे ॲड. टंडन यांनी पळ काढला आणि जवळच्या मोंटेक्‍स फोटो स्टुडिओत आश्रय घेतला. तेथे घुसून आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले. टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

गिट्टीखदान पोलिसांना माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आरोपीचे नाव समजल्याने पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. कोराडीकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुकानदारांना होता त्रास
ॲड. टंडन या वकिलीच्या भरवशावर दुकानदारांना त्रास देत असत. कुणाही भाजी किंवा फळविक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे देत नसत. दुकानदारांनी पैशाची मागणी केल्यास ओळखत नाही काय, असे बोलून अतिक्रमण विभागाकडे तक्रार करेन, अशी धमकी देत असत. तरीही दुकानदारांनी पैशासाठी आग्रह धरल्यास त्या नासुप्र, मनपा आणि संबंधित विभागांकडे दुकानदारांच्या तक्रारी करीत असत. त्यामुळे त्या परिसरातील दुकानदार त्रस्त झाले होते.

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व
वादग्रस्त वकील म्हणून ॲड. टंडन यांची ओळख होती. नागपुरात गाजलेल्या संजयसिंह आणि सुभाषसिंह प्रकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यानंतर त्यांचा सी. प्रभाकर या आयपीएस अधिकाऱ्याशी झालेला घटस्फोट आणि त्यातून लाटलेली भरमसाठ रक्कम हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. त्या जिल्हा आणि उच्च न्यायालयात वकिली करायच्या. त्यांच्यावर वकिलांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होता. त्यांच्यावर गिट्टीखदान पोलिस स्टेशनला मारहाण, खंडणी उकळणे असे ४ गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांच्याकडे मोबाईल सापडला होता. सध्या त्या सोलेमन नावाच्या व्यक्तीसोबत राहायच्या. हा त्यांचा सहावा पती असल्याची माहिती आहे.