शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद

शाहिद अली
शनिवार, 8 जुलै 2017

शेतातील कामे उरकून त्याचे पालक सायंकाळी घरी आल्यावर त्यांना प्रतीप घरी नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांसोबत शोधाशोध सुरू केली. सायंकाळी साडे सातच्या सुमारास शाळेतील एका बंद अंधाऱ्या वर्गखोलीत प्रतीप एकटाच घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत असल्याचे खिडकीतून दिसले.

पवनी (जि. भंडारा) - इटगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा सुटल्यानंतर वर्गखोलीत विद्यार्थी आहेत किंवा नाहीत हे न तपासता शाळेतील शिक्षकांनी वर्गखोलीला बाहेरून कुलूप लावले. मात्र शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पहिल्या इयत्तेतील एका सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला तब्बल चार तास बंद वर्गखोलीत अडकून पडावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांसह ग्रामस्थांनी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तालुक्‍यातील इटगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी भरली होती. सकाळी साडे दहा वाजता प्रतीप भगवान पांचलवार हा पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेत हजर होता. सायंकाळी चारच्या सुमारास शिक्षकांनी शाळा सोडली. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर सर्व वर्गखोल्यांना शिक्षकांनी आत कोणी आहे किंवा नाही हे न पाहता कुलूप लावले. दरम्यान शाळा सुटल्यानंतर वर्गखोलीतून बाहेर न आल्याने प्रतीप आतच अडकला होता. शेतातील कामे उरकून त्याचे पालक सायंकाळी घरी आल्यावर त्यांना प्रतीप घरी नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांसोबत शोधाशोध सुरू केली. सायंकाळी साडे सातच्या सुमारास शाळेतील एका बंद अंधाऱ्या वर्गखोलीत प्रतीप एकटाच घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत असल्याचे खिडकीतून दिसले.

हा प्रकार समजल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने मुख्याध्यापिकेशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खोलीचे कुलूप फोडून प्रतीपला बाहेर काढला. अभय राऊत या सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पालकांनी प्रतीपला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणातील दोषी शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स