स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच! 

विरेंद्रसिंह राजपूत
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सुजातपूर या गावात स्वातंत्र्याच्या सत्तरीतही पक्का रस्ता नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह जनतेचे अतोनात हाल होत आहेत. लोकवर्गणीतून रस्ता बनविण्याच्या स्वप्नांनाही इथे बळ मिळत नसल्याने नागरिकांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. 

सुजातपूर हे गाव खामगाव तालुक्‍यात येत आहे. नांदुऱ्यापासून महामार्गालगत दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव कच्च्या रस्त्याने जोडलेले आहे. या दुर्गम गावाच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. इथे पक्का रस्ता होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुरूम आणि गिट्टी या रस्त्यावर आणून टाकली; पण रस्त्यालगतच्या आमसरी गावातील चार शेतकऱ्यांनी या कामात आडकाठी आणून हा रस्ता बंद केला. 

त्यानंतर हा रस्ता सुरू व्हावा, यासाठी गावकऱ्यांनी दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून रितसर परवानगीही मिळविली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी राजकीय हस्तक्षेपातून या रस्त्याचे काम अडविले आहे. यावर अजून तोडगा निघालेला नाही. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. गारा तुडवत जावे लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. 

एकीकडे 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया'चे वारे देशात वाहत असताना सुजातपूरसारख्या दुर्गम गावाला स्वातंत्र्याच्या पक्‍क्‍या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावाला पक्‍क्‍या रस्त्याने जोडण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.