१०९ महाविद्यालयांवर टांगती तलवार

Nagpur-University
Nagpur-University

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संलग्नीकरण करण्यासाठी महाविद्यालयांना वारंवार नोटीस पाठविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून १०९ महाविद्यालयांकडून कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठ लवकरच प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

एकेकाळी नव्या महाविद्यालयांच्या परवानगीसाठी शेकडो संस्थाचालक रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातूनच बीसीए, बीसीएस, बीसीसीए आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रमांना मागणी वाढल्याने आठ वर्षांपूर्वी विद्यापीठात नव्या महाविद्यालयांचे पीक आले. त्यामुळे विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या साडेसातशेहून अधिक झाली. महाविद्यालये घेणाऱ्यांमध्ये बऱ्याच नामवंत संस्थांचाही समावेश होता. 

मात्र, कालांतराने या अभ्यासक्रमांना गळती लागल्याने महाविद्यालयात पटसंख्येत घट झाली. विद्यापीठातील अडीचशे महाविद्यालयातील बोगस प्रवेशाचे प्रकरण समोर आल्यावर ही बाब चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर त्यापैकी साठहून अधिक महाविद्यालये बंद झाली. याशिवाय अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही काही शाखा बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विद्यापीठाकडून प्रत्येक महाविद्यालय दरवर्षी संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, या वर्षी १९६ महाविद्यालयांनी संलग्नीकरणासाठी अर्जच केलेला नाही.

दुसरीकडे संलग्नीकरण केलेल्या महाविद्यालयांची तपासणी स्थानिक चौकशी समिती (लोकल इन्क्वायरी कमेटी) लावणे आवश्‍यक असते. बऱ्याच महाविद्यालयांनी ती समिती लावलेली नाही. यावरून विद्यापीठाने या महाविद्यालयांना वेळोवेळी पत्र पाठवून सूचना दिल्यात. यातूनच काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे संलग्नीकरण नियमित केले. मात्र, १०९ महाविद्यालये संलग्नीकरण करण्यास तयार नसल्याने ही महाविद्यालये आता बंद होणार आहेत. विद्यापीठाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. तसा अधिकृत दुजोराही प्र-कुलगुरुंनी दिला.

संख्या साडेचारशेंवर येणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एकेकाळी आठशेवर महाविद्यालयांचा समावेश होता. मात्र, विद्यार्थी संख्येअभावी बरीच महाविद्यालये बंद झालीत. काही महिन्यांपूर्वी विद्यापीठातील ७० महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची संख्या ६५० पेक्षा अधिक आहे. आता १०९ महाविद्यालये गळाल्यास ४५० च्या घरात महाविद्यालयेच विद्यापीठाशी संलग्नित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com