डॉ. मिश्रांची पदविका रद्द

Dr-Vedprakash-Mishra
Dr-Vedprakash-Mishra

नागपूर - गेल्या तीस वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सक्रिय आणि प्रशासनात आदराचे स्थान असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा विभागातील स्नातकोत्तर पदविकेच्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये ‘कॉपी’ केल्याप्रकरणी परीक्षा मंडळाने त्यांचे  पदविका प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोमवारी (ता. २६) झालेल्या मंडळाच्या बैठकीत त्यांना  प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले होते.  

गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी १९८७ साली डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आवश्‍यक असलेला ‘फिल्ड रिपोर्ट’ जसाच्या तसा ‘कॉपी’ करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन कार्यकारी परिषदेने न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने संपूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता. या अहवालात त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करावे, प्राधिकरणावरील सदस्यत्व रद्द करावे तसेच त्यांना या प्रकरणात मदत करणाऱ्या विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशा शिफारशी केल्या होत्या. या अहवालाविरोधात डॉ. मिश्रा यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. सन २०१३ मध्ये डॉ. मिश्रांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. 

त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कुलगुरूंनी डॉ. मिश्रांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावून लेखी उत्तरही मागविले. मात्र, डॉ. मिश्रा एकदाही आले नाही. दुसरीकडे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार परत करून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर डॉ. मिश्रांनी पदविका परत करीत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. मात्र, परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर कारवाई होणार ही बाब निश्‍चित झाली होती. सोमवारी (ता.२६) पुन्हा एक संधी म्हणून लेखी उत्तर आणि सुनावणीसाठी त्यांना बोलवण्यात आले होते.

आजही गैरहजर राहिल्याने कारवाई म्हणून त्यांचे पदविका प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे छायाचित्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘नोटेबल अल्युम्नी’ मधून काढण्यात आल्याची माहितीही डॉ. काणे यांनी दिली. तसेच त्यांनी परत केलेला ‘जीवन साधना’ पुरस्कारही काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. 

या प्रकरणात त्यांना मदत करणारे तत्कालीन विभागप्रमुख सध्या हयात नसल्याने तत्कालीन सहाय्यक प्राध्यापक आणि सध्याचे विभागप्रमुख डॉ. के. एस. भारती यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उपस्थित होते. 

कारवाईचा अहवाल एमसीआयकडे पाठविणार
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसह गेल्या ३० वर्षांत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्यांवर काम केले आहे. सध्या ते कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत  विद्यापीठाचे कुलपती आहेत. शिवाय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या विविध समित्यांचे  सदस्य आहेत. त्यांच्यावरील ‘कॉपी’या आरोप सिद्ध झाल्याने हा अहवाल त्यांना मूळ पदवी देणाऱ्या संस्थेकडे म्हणजेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एमसीआय) पाठविणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्यास नकार 
न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अहवालानुसार कारवाई करताना परीक्षा मंडळाकडून डॉ. मिश्रांच्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यास कुलगुरूंनी स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे अहवालात असे कुठेच नमूद नसल्याने समितीच्या सात शिफारशींवरच कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. यापैकी चार शिफारशी आता लागू करता येणे शक्‍य नसल्याचे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले. 

कायदा सर्वांसाठी समान आहे. विद्यापीठाने ही कारवाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार करणारा कितीही मोठा असला तरीही सुटणार नाही. हे प्रकरण अशा फसवणूक करणाऱ्यांसाठी एक धडा ठरणार आहे. 
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com