विदर्भातील 17 जणांना शिवछत्रपती पुरस्कार 

SHIVCHATRAPATI PURASKAR
SHIVCHATRAPATI PURASKAR

नागपूर : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती, जिजामाता, एकलव्य क्रीडा पुरस्कारांची सोमवारी मुंबई येथे घोषणा करण्यात आली. त्यात विदर्भातील एकूण 17 विजेत्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये वाशीमचे रोहिदास पवार, अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड, अमरावतीचे प्रमोद चांदूरकर, आर्चरीतील आंतरराष्ट्रीय पदक विजेती पूर्वशा शेंडे, वृषाली गोरले, विदर्भाचा पहिला ग्रॅंडमास्टर स्वप्नील धोपाडे, अमरावतीच्या संगीता येवतीकर यांचा समावेश आहे.


शासनातर्फे 2014 ते 2017 या तीन वर्षांतील छत्रपती पुरस्कारविजेते जाहीर करण्यात आले. यात नागपुरातील बुद्धिबळपटू अनुप देशमुखशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला हॅण्डबॉलपटू पूनम कडव, स्केटर पीयूष आकरे, आट्यापाट्या संघटक अशोक पाटील, पॉवरलिफ्टर गुणवंत कमलेश लांजेवार व प्रतिमा बोडे यांचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय मास्टर अनुपला 2016-17 या वर्षासाठी क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार घोषित झाला. राज्य शासनातर्फे त्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्याची ही दुसरी वेळ होय. यापूर्वी 1999 मध्ये खेळाडू म्हणून त्यांना छत्रपती पुरस्कार मिळाला होता. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकावणाऱ्या अनुपने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. युवा हॅण्डबॉलपटू पूनमलाही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. तिलादेखील 2016-17 या वर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. सुनील भोतमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पूनमने बांगलादेशमधील आयएचएफ ट्रॉफी (2016), थायलंडमधील दक्षिण आशियाई ज्युनियर हॅण्डबॉल स्पर्धा (2017) आणि उझबेकिस्तानमधील (2017) आशियाई महिला लीग या तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

पुरस्कारविजेत्यांमध्ये विदर्भातील एकूण 17 जणांचा समावेश आहे. यात विदर्भातील पहिला ग्रॅण्डमास्टर स्वप्नील धोपाडे, वाशीमचे रोहिदास पवार, अमरावतीच्या आर्चर पूर्वशा शेंडे, वृषाली गोरले, वाशीमचा आट्यापाट्या खेळाडू सागर गुल्हाणे, अमरावतीची आट्यापाट्या खेळाडू नीता रंगे, वाशीमचा आट्यापाट्या खेळाडू अमित चव्हाण, भंडाऱ्याची दीपाली सहारे, भंडाऱ्याची कल्याणी बेंदेवार, अमरावतीच्या संगीता येवतीकर आणि अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड यांचा समावेश आहे. 

विदर्भातील पुरस्कारविजेते खेळाडू व संघटक 
2014-15 : उत्कृष्ट संघटक : अशोक पाटील (नागपूर, आट्यापाट्या), रोहिदास पवार (वाशीम). उत्कृष्ट खेळाडू : पीयूष आकरे (नागपूर, स्केटिंग), पूर्वशा शेंडे, वृषाली गोरले (दोघीही अमरावती, आर्चरी), सागर गुल्हाणे (वाशीम, आट्यापाट्या), नीता रंगे (अमरावती, आट्यापाट्या). 
2015-16 : उत्कृष्ट संघटक : प्रमोद चांदूरकर (अमरावती, आर्चरी), उत्कृष्ट खेळाडू : स्वप्नील धोपाडे (अमरावती, बुद्धिबळपटू), अमित चव्हाण (वाशीम, आट्यापाट्या), दीपाली शहारे (भंडारा, आट्यापाट्या), एकलव्य पुरस्कार : गुणवंत कमलेश लांजेवार (नागपूर, पॉवरलिफ्टर), प्रतिमा बोंडे (नागपूर, पॉवरलिफ्टर), जिजामाता पुरस्कार : संगीता येवतीकर (अमरावती). 
2016-17 : उत्कृष्ट मार्गदर्शक : अनुप देशमुख (नागपूर, बुद्धिबळ), उत्कृष्ट संघटक : शत्रुघ्न बिरकड (अकोला), कल्याणी बेंदेवार (भंडारा, आट्यापाट्या), उत्कृष्ट खेळाडू : पूनम कडव (नागपूर, हॅण्डबॉल). 

"मला बुद्धिबळाने खूप काही दिले आहे. त्यामुळेच मी युवा खेळाडूंना शिकवित असतो. त्यामोबदल्यात कधीही कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. या वेळी पुरस्कारासाठी मी स्वत:हून अर्ज केला नाही. स्वप्नील धोपाडेच्या आईनेच सर्व प्रयत्न केले. त्यामुळे या पुरस्काराबद्दल मी शासनासोबतच त्यांनाही धन्यवाद देतो.' 
-अनुप देशमुख (आंतरराष्ट्रीय मास्टर) 


"राज्य शासनाचा छत्रपतीसारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार मी आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ असून, याचे सर्व श्रेय मी प्रशिक्षक डॉ. सुनील भोतमांगे आणि माझ्या आईवडिलांना देते. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून, भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. ' 
-पूनम कडव (आंतरराष्ट्रीय महिला हॅण्डबॉलपटू) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com