बेपत्ता पोलिस शिपायाचा मृतदेह आढळला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नागपूर - बुधवारपासून बेपत्ता असलेल्या पोलिस शिपायाचा मृतदेह शुक्रवारी मोहगाव झिल्पी येथील तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. शुक्रवारी त्याचे लग्न निश्‍चित होते, त्याच दिवशी त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बाब पुढे आली. 

नागपूर - बुधवारपासून बेपत्ता असलेल्या पोलिस शिपायाचा मृतदेह शुक्रवारी मोहगाव झिल्पी येथील तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. शुक्रवारी त्याचे लग्न निश्‍चित होते, त्याच दिवशी त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बाब पुढे आली. 

राजेश रामदास सायरे (वय 29, रा. रानवतीनगर, वाडी असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. त्याची काटोल ठाण्यात नेमणूक होती. शुक्रवारी सकाळी त्याचे लग्न होते. कुटुंबीयांनी तयारीही पूर्ण केली होती. पण, हळदीच्या एकदिवस आधी बुधवारी तो दहा मिनिटांमध्ये परत येत असल्याचे सांगून घरून निघून गेला. बराचवेळ लोटूनही घरी न परतल्याने चिंताग्रस्त कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. कुटुंबीयांनी विचारपूस केली असता, राजेश मोहगाव झिल्पी तलाव परिसरात बिअर पिताना आढळल्याची बाब पुढे आली. याबाबत त्यांनी वाडी पोलिसांना माहिती दिली. ही माहिती हिंगणा पोलिसांना देऊन शोध घेण्यास सांगण्यात आले. तलाव परिसरात जाऊन बघितले असता, राजेशची दुचाकी आणि चपला तेथे दिसून आल्या. यानंतर तलावाच्या पाण्यात मोटार बोटच्या मदतीने राजेशचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. लग्नाच्या दिवशीच राजेशचा मृतदेह घरी आल्याने आप्तांचे अवसानच गळाले असून वाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

15 दिवसांपासून सुट्यांवर 
प्राप्त माहितीनुसार राजेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो शांत स्वभावाचा होता. लग्नासाठी कपडे घ्यायचे असल्याचे सांगून तो 15 दिवसांपूर्वीपासूनच सुट्यावर आला होता. घरी लग्नाची तयारी सुरू असली तरी त्याने मित्रांना लग्नाचे निमंत्रणही दिले नव्हते. लग्नाआधी त्याने आत्मघातकी पाऊल का उचलले, हा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

Web Title: Missing Police dead bodies found