चौकशीसाठी ‘एमपीसीबी’ अधिकारी वेणा नदीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

हिंगणा - वेणा नदी जलप्रदूषण झाल्याने इकॉर्नियाने वेढा घातला आहे. याबाबत सामाजिक प्रश्‍न म्हणून इकॉर्नियाचा विषय रेटून धरण्यात आला. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी वेणा नदीला भेट देऊन इकॉर्नियाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. 

हिंगणा - वेणा नदी जलप्रदूषण झाल्याने इकॉर्नियाने वेढा घातला आहे. याबाबत सामाजिक प्रश्‍न म्हणून इकॉर्नियाचा विषय रेटून धरण्यात आला. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी वेणा नदीला भेट देऊन इकॉर्नियाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. 

हिंगणा एमआयडीसी उद्योगातील प्रदूषित पाणी अमरनाल्यात सोडले जाते. हेच पाणी वेणा नदीत मिसळत आहे. यामुळे इकॉर्निया नावाची जलपर्णी तीन ते चार किलोमीटर नदी पात्रात पसरली  आहे. यामुळे पाणी दूषित झाल्याने या वनस्पतीचा नायनाट करावा व पाण्याचे जलशुद्धीकरण करावे, ही मागणी रेटून धरण्यात आली. सामाजिक प्रश्‍न असल्याने जनमानसात याबाबत चर्चा झाली. 

इकॉर्नियाची दखल घेऊन सामाजिक व राजकीय पक्षांनी तहसीलदार प्रताप वाघमारे यांना निवेदन दिले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. आमदार समीर मेघे यांनी वेणा नदीतील इकॉर्निया जलपर्णी कशामुळे झाली, याची चौकशी करून उपाययोजना सुचवावी असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठविले. खासदार कृपाल तुमाने यांनीही वेणा नदी बचावासाठी इकॉर्निया काढून जलशुद्धीकरण करणे  गरजेचे आहे, अशी भूमिका मांडली.

‘सकाळ’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित केले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून प्रतिक्रिया घेण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग यावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आला. क्षेत्रीय निरीक्षक उमेश बहादुले यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली. त्यानुसार वृत्त प्रकाशित करण्यात आले. उपप्रादेशिक अधिकारी हसबनीस मुंबई दौऱ्यावर होते. यानंतर कार्यालयीन कामासाठी पुणे येथे गेले. ९ एप्रिलला प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल  घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लोहोडकर व क्षेत्रीय निरीक्षक उमेश बहादुले यांनी वेणा नदीला भेट देऊन पाहणी केली. इकॉर्निया नेमका कशामुळे नदीपात्रात पसरला याची चौकशी केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर वेणा नदीची समस्या गवसली. हिंगणा तालुक्‍यातील जीवनवाहनी  आहे. वेणा नदीला भेट दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा काय अहवाल तयार केला. हा अहवाल अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. अहवालाची माहिती स्पष्ट झाल्यास जनतेलाही वेणा बचावाला हातभार लावता येईल, ही माफक अपेक्षा.