सांडपाणी प्रक्रियेसाठी नगर परिषदांना शुल्क 

सांडपाणी प्रक्रियेसाठी नगर परिषदांना शुल्क 

नागपूर - नगर परिषद व नगरपालिकांना त्यांच्या शहरातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागणार आहे. शहरानजिकच्या नगर परिषद, नगरपालिका क्षेत्रात मलनिस्सारण तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्याने तेथील शौचालयाच्या घाणीवर भांडेवाडीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया करण्याबाबत प्रस्ताव मनपा सभागृहात सूचनेसह मंजूर करण्यात आला. 

राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यासाठी 2015 मध्ये काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत महापालिकेच्या पेंच प्रकल्प विभागाने नगरपरिषद व नगरपालिकांची घाण भांडेवाडीत प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. शुक्रवारी हा प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी आला. यावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी नगर परिषदांना शुल्क आकारावे, अशी सूचना केली. याबाबतचे दर ठरविण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवावा, असेही त्यांनी नमुद केले. त्यामुळे आता नगर परिषद व नगरपलिकांना शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र मोफत उपलब्ध होणार नाही, हे स्पष्ट झाले. स्थायी समिती याबाबत दर निश्‍चित करणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेच्या भांडेवाडीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरील ताण कमी झाला आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गावांमध्ये ज्यांच्याकडे शौचालये नव्हती, त्यांना शौचालये देण्यात आली. ही शौचालये तयार करताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सेप्टिक टॅंकचा वापर केला. परंतु, सेप्टिक टॅंकमध्ये तयार होणाऱ्या घाणीवर प्रक्रिया करण्याची कुठलीही सुविधा नगर परिषद क्षेत्रात नाही. सेप्टिक टॅंकमधील घाणीवर प्रक्रियेची मोठी समस्या निर्माण झाल्याने ज्या शहरांत एसटीपी आहे, त्याचा वापर करावा, असे राज्य शासनाच्या परिपत्रकात नमुद आहे. महापालिकेच्या पेंच प्रकल्प विभागाने याबाबत औदार्य दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी नगर परिषदांकडून शुल्क आकारणीची सूचना करीत भांडेवाडी येथील आधीच त्रस्त नागरिकांना दिलासाही दिला. 

राज्य शासनाचे परिपत्रकही फार्स? 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत काही नगर परिषदांना स्वच्छतेत गुणांकन मिळावे, या हेतूने राज्य शासनाने हे परिपत्रक काढले. मुळात नगर परिषद, नगरपालिका सांडपाणी वाहून नागपूरला आणण्याऐवढी सक्षम नाही. केवळ स्वच्छता अभियानासाठीच हे परिपत्रक होते, असे अधिकाऱ्याने नमुद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com