२९ टक्केच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नोंदणीमध्ये बऱ्याच प्रमाणात तांत्रिक अडचणी असल्याने टक्केवारी कमी दिसत आहे. ही अडचण लवकरात लवकर दूर करून नोंदणीचा टक्का वाढविण्यात येईल.  
- दीपेंद्र लोखंडे,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

नागपूर - शालेय शिक्षण विभागाने नागपुरातील सर्व शाळांना सोमवारपर्यंत (ता. २५) प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकासह ‘स्टुडंट पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने २०१७-१८ च्या शिक्षक पदभरतीला याच आधारे मंजुरी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही आधार नोंदणीत शाळांमध्ये कमालीची उदासीनता असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शनिवारी (ता. २३) रात्रीपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील शाळांकडून २९.४३ टक्केच  शाळांनी आधारची नोंदणी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  

गत दोन वर्षांपासून शिक्षण विभाग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाअंतर्गत विविध योजना चालवित आहे. विद्यार्थ्यांची ‘स्टुडंट पोर्टल’वर नोंदणी याचाच एक भाग आहे. शिक्षण विभागाला आधार क्रमांकासह पोर्टलवर नोंदणी केल्याने बोगस विद्यार्थ्यांच्या समस्येपासून सुटका मिळण्याचा विश्वास आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमध्ये यावेळी आधार क्रमांक जोडले जात आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यात बनलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आयडीची सर्वशिक्षण अभियानाअंतर्गत बनलेल्या क्‍लस्टर स्तर, ब्लॉक स्तर व अन्य स्तरांवर चौकशी करून सत्यापनाचे पुष्टीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता व मूलभूत शिक्षणासारखी माहिती नोंदविली आहे, जी शाळांतर्फे नोंदविण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थ्यांची आयडी त्याची जात, विशेष विद्यार्थी दर्जा आणि आता आधार क्रमांकासारखी माहिती नोंदविली जात आहे. त्यासाठी सोमवार शेवटचा दिवस आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही तालुक्‍याने ५० टक्केचा टप्पा गाठला नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील शाळांची नोंदणी २५ टक्‍क्‍यांवरही नसल्याचे दिसते. शहर आणि जिल्ह्यात ९ लाख १४ हजार २५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी २ लाख ६९ हजार ९४ विद्यार्थ्यांची नोंदणी सरलमध्ये करण्यात आली. याची टक्केवारी २९.४३ टक्के आहे. विशेष म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४५ हजार २३५ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. उद्या शेवटला दिवस असल्याने याबद्दल अधिकाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांची माहिती ‘इनव्हॅलिड’
जिल्ह्यातील शाळांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, सरलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि आधार क्रमांकावर असलेली माहिती ‘मॅच’ होत  नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची माहिती ‘ब्लॅंक’ किंवा ‘इनव्हॅलिड’ दाखविण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ६ लाख ४५ हजार २३५ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच नोंदणीची टक्केवारीही कमी दिसत असल्याचे बोलले जात आहे.