दोन आठवड्यांच्या अधिवेशनात न्याय कसा मिळेल?

दोन आठवड्यांच्या अधिवेशनात न्याय कसा मिळेल?

नागपूर - उपराजधानीचा नाममात्र दर्जा असलेल्या नागपुरात होणारे अधिवेशनही नाममात्रच आहे. दोन आठवड्यांच्या अधिवेशनातही मोजक्‍याच दिवशी चालणाऱ्या कामकाजात विदर्भाला न्याय कसा मिळेल, असा सवाल आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी उपस्थित करीत सरकारला पुन्हा एकदा घरचा अहेर दिला.

जनमंचच्या जनसंवाद उपक्रमांतर्गत शनिवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित ‘नागपूर अधिवेशनाचा विदर्भाला काय लाभ?’ विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे प्रकाश इटनकर होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील व श्रीकांत झोड होते.

नागपूर करारानुसार सहा आठवड्यांचे अधिवेशन होणे अपेक्षित आहे. मात्र, अलीकडच्या काळात दोन आठवड्यांचे अधिवेशन होते. यंदा पहिला दिवस शोक प्रस्ताव, दुसरा दिवस मोर्चा, तिसरा दिवस गोंधळात गेला. आता दोन दिवसांच्या सुट्या आल्या आहेत. सोमवारी गुजरातच्या निकालामुळे दिवस जाणार आहे. नागपूरच्या गुलाबी थंडीचा आनंद घेऊन नेते मंडळी परततील एवढेच अधिवेशनाचे महत्त्व आहे. सत्तेपुढे झुकण्याचा वैदर्भीय स्वभाव बदलल्याशिवाय वेगळा विदर्भ मिळणार नाही. एका अधिवेशनाने भागणार नाही. तिन्ही अधिवेशन इथेच व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्रीपाद अपराजित यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या या वैदर्भीय अस्मितेच्या हत्या असल्याचे सांगितले. वैदर्भीय जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती प्रारंभापासून राहिली. आपण त्याला विरोधही दर्शविला नाही. विदर्भात केवळ सिंचनाचाच नाही, तर कर्तव्याचाही अनुशेष आहे. अधिवेशनात तासांची औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा काय काम केले हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. इटनकर यांनी हिवाळी अधिवेशन केवळ पॅकेज टूर असल्याची टीका केली. प्रा. पाटील यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

मंत्री असूनही आत्महत्या, भारनियमनाचा प्रश्‍न
मुख्यमंत्र्यांना आटोकाट प्रयत्न करूनही हवा तसा बदल करता आला नाही. कृषी व ऊर्जामंत्री इथले असूनही विदर्भात शेतकऱ्यांना समस्या भेडसावत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. ७० टक्के वीजनिर्मिती होत असतानाही भारनियमनाचा प्रश्‍न आहे. दुसरीकडे छत्तीसगढ राज्यात वीज स्वस्त असल्याने तिथे उद्योग सुरू झाले. या उलट इकडचे उद्योग बंद होत असून, युवकांचे स्थलांतर सुरू आहे. यामुळेच विदर्भातील लोकसभेची एक आणि विधानसभेच्या चार जागा कमी झाल्याची खंत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com