‘आपले संविधान’, ‘संविधान ओळख’ पुस्तकांचे आज प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

‘सकाळ’मधील प्रकाशित  लेखांचे ‘आपले संविधान’
संविधान साक्षरता वर्षानिमित्त सकाळच्या विदर्भ आवृत्तीमध्ये सलग दोन वर्षे ‘जागर’ या स्तंभामध्ये खोब्रागडे यांनी संविधानाची ओळख करून दिली. संविधानाने सामान्य माणसाला दिलेले हक्क, अधिकार याचे विवेचन केले. हा लेखसंग्रह ‘आपले संविधान’ या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. तर, संविधान प्रास्ताविकेचे शाळांमधून वाचन आणि २६ नोव्हेंबर संविधानदिन या देशातील पहिल्या उपक्रमाची माहिती देणारे ‘संविधान ओळख’ हे दुसरे पुस्तकही यावेळी प्रकाशित होईल.

नागपूर - शासकीय नोकरीत कार्यरत असताना देशभरात संविधानाबद्दल जनजागृती  करणारे माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे भारतीय संविधानावर लिहिलेल्या  ‘संविधान ओळख’ आणि ‘आपले संविधान’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (ता. २६) सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता होईल. संविधान फाउंडेशनतर्फे आयोजित सोहळ्यात पुस्तकांचे प्रकाशन निवृत्त न्यायाधीश किशोर रोही यांच्या हस्ते होईल. 

अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे असतील.  ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे व पुणे येथील यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड प्रमुख पाहुणे असतील. 

शासकीय सेवेत असताना आलेल्या अनुभवांना खोब्रागडे यांनी ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकातून वाट मोकळी करून दिली. राज्यभरात संविधान प्रास्ताविकेचे शाळा-महाविद्यालयांमधून वाचन व्हावे तसेच २६ नोव्हेंबर हा संविधानदिन पाळण्यासाठी खोब्रागडे यांचे मोलाचे योगदान आहे. राज्याचे समाजकल्याण आयुक्त आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव असताना खोब्रागडे यांनी संविधानाबद्दल जनजागृती केली, हे विशेष. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, रेखा खोब्रागडे, शिरीष कांबळे, विजय बेले यांनी केले आहे.