सोळा वर्षांनंतर पत्नीचे निर्दोषत्व सिद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर - पती वसंत यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या पत्नीचे निर्दोषत्व तब्बल सोळा वर्षांनंतर सिद्ध झाले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नी सुमन मोगरेची निर्दोष सुटका केली.

वसंत व सुमनचे १७ एप्रिल २००१ रोजी लग्न झाले. लग्नानंतर दोघेही वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे राहू लागले. महिनाभरातच दोघांमध्येही खटके उडण्यास सुरुवात झाली. वसंतच्या आरोपांनुसार सुमन सोबत रहायला तयार नव्हती. वारंवार माहेरी जायची. एकदा माहेरी गेली  असता वसंतने तिला १ जुलै २००१ रोजी परत आणले. एके दिवस सकाळी वसंत काम करीत असताना तहान लागली. यामुळे तो पाणी पिण्यासाठी विहिरीजवळ आला. त्यावेळी सुमनने त्याला धक्का मारला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली असता काही जणांनी त्याला वाचविले. याप्रकरणी वसंतने पत्नी सुमननेच मारण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

याप्रकरणी वर्धा सत्र न्यायालयाने सुमनला पतीची हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी मानत ७ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. याविरुद्ध सुमनने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर तिला जामीन मिळाला. मात्र, तिचे अपील प्रलंबित होते. सोळा वर्षांनंतर तिला निर्दोष सोडण्यात आले. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.