गमतीजमतीत सुटली गोळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नागपूर - पत्नीला पिस्तूल दाखवत गोळी कशी चालवायची शिकवित असताना अचानक गोळी सुटली. ती गोळी सरळ पत्नीच्या जबड्यात घुसली. सीमा तिवारी (वय ३०) या गंभीर जखमी असून, शस्त्रक्रिया करून फसलेली गोळी काढण्यात आली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून, यातील अवैध पिस्तूल वापणारा युवक फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. आशीष राजेंद्रप्रसाद तिवारी (वय ३५, रा. अंजना टाऊन, गोधनी रोड, मानकापूर) असे आरोपी पतीचे नाव आहे. ते पिस्तूल कुख्यात आरोपी पिन्नू उर्फ कुलदीप शशीधर पांडे (अवस्थीनगर) असे त्याच्या आरोपी मावसभावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रप्रसाद तिवारी हे रेल्वेत कर्मचारी असून, आशीष हा एकुलता मुलगा आहे. बेरोजगार असलेला आशीष गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याचा अवस्थीनगरात राहणारा मावसभाऊ पिन्नू पांडे हा वाँटेड आरोपीसोबत राहत होता. पिन्नू पांडेने गेल्या काही दिवसांपूर्वी एक पिस्तूल आशीषला दिले होते. ते पिस्तूल त्याने बेडखाली लपवून ठेवले होते. मंगळवारी दुपारी पिन्नू पांडे हा आशीषच्या घरी आला. त्याच्या बेडरूममध्ये आशीष व त्याची पत्नी सीमा आणि पिन्नू बसलेले होते. पिन्नूने त्याच्याकडे पिस्तुलाची मागणी केली. आशीष हा पत्नीला पिस्तूल कशी चालवायची शिकवत होता. दरम्यान, ट्रिगर दबल्या गेल्यामुळे पिस्तुलातून गोळी सुटली आणि सीमाच्या जबड्यात घुसली. गोळी चालल्याचा मोठ्याने आवाज आल्यामुळे अचानक धावपळ निर्माण झाली. सीमा रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेली होती. कुटुंबीयांनी सीमाला छावणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. आज दुपारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या जबड्यातून गोळी काढण्यात आली असून प्रकृती ठीक आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती आशीष तिवारीला अटक केली, तर अन्य आरोपी पिन्नू पांडे हा फरार आहे.

आरोपींनी काढला पळ
पत्नी सीमाला पिस्तूल दाखवत असताना गोळी सुटली आणि जबड्यात घुसली. ती रक्‍ताच्या थारोळ्यात पडली असता तिचा मृत्यू होईल आणि पोलिस पकडतील, या भीतीपोटी पती आशीष आणि पिन्नू पांडे या दोघांनी पळ काढला. यावेळी अंगणात काम करीत असलेल्या सीमाच्या सासूला दोघेही पळताना दिसले. त्यामुळे तिने घरात पाहिले असता सीमा विव्हळताना दिसली. तिने शेजारच्यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले.

प्रकरण क्राइम ब्रॅंचला भोवणार
पिन्नू पांडे कुख्यात गुंड असून, त्याला काही दिवसांपूर्वी गिट्टीखदान पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि अन्य एका गुन्ह्यात अटक केली होती. पोलिस कोठडीत असताना गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असताना पळून गेल्याच्या प्रकरणी प्रोडक्‍शन वारंटवर ताब्यात घेणे आवश्‍यक होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले नाही, त्यामुळे ही गोळी चालल्याची घटना घडली. त्यामुळे हे प्रकरण गुन्हे शाखेला भोवणार असल्याची चर्चा पोलिस दलात आहे.