सायको ‘छल्ला’ तावडीत 

सायको ‘छल्ला’ तावडीत 

नागपूर - इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणासह तीन ‘अनडिटेक्‍ट मर्डर मिस्ट्री’चा पर्दाफाश करण्यात लकडगंज पोलिसांना यश आले आहे. तीनही खून प्रकरणात पोलिसांनी क्रूरकर्मा छल्ला ऊर्फ दुर्गे ध्रुपसिंग चौधरी (२८) याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणानंतर त्यांची हत्या  केल्याचे आणि साथीदाराचाही मुडदा पाडल्याची कबुली दिली आहे.

मोहम्मद अरमान मो. आलेसरवर (१५) रा. देशपांडे ले-आऊट, आरीफ मुन्ने अंसारी (१७) रा. गौरीशंकरनगर अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची, तर कैलास नागपुरे (२८) रा. देशपांडे ले-आउट असे खून झालेल्या साथीदाराचे नाव आहे. इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्काजवळील झुडपात २६ ऑक्‍टोबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तरुणाचे धड कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. शिरही छिन्नविछिन्न करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात लकडगंज पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करीत आरोपीचा सुगावा लावणे सुरू केले. हरविलेल्या मुलांची माहिती घेत पोलिस अरमानच्या घरी  पोहोचले. 

पालकांनी अरमानचे कपडे आणि चपला ओळखल्या. घटनास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता त्यात अरमान दिसून आला. मागून जाणारा दुसरा व्यक्ती मात्र कुणाच्याही ओळखीतील नव्हता. महतप्रयत्नांनंतर दुसरा व्यक्ती ‘छल्ला’ असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित पोलिसांच्या चौकशीत मृतांची ओळख पटली होती. आरिफ आणि अरमान या दोघांवरही अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर पाप लपविण्यासाठी त्यांची हत्या केल्याची कबुली छल्लाने दिली असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांच्या माहितीनुसार वेलतूर ठाण्याच्या हद्दीत २००९ मध्ये मित्राच्याच खून प्रकरणात छल्लाला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर तो कारागृहाबाहेर आला. 

पुराव्याअभावी या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. परिमंडळ क्रमांक ३ चे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक पोलिस आयुक्त वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या तपासात पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक सागर निकम, उपनिरीक्षक गाडेकर, रवी राठोड, भोजराज बांते, अजय बैस, रमेश गोडे, दीपक  कारोकार, लक्ष्मीकांत गावंडे, प्रशांत चचाने, प्रदीप सोनटक्के, सुनील ठवकर, सतीश ठाकूर यांचा समावेश होता.

चार दिवसांनी दिली कबुली
छल्लाला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, तो मध्यवर्ती कारागृहात असल्याचे पुढे आले. कायदेशीर प्रक्रियेनंतर लकडगंज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चार दिवस घाम गाळल्यानंतर तो फुटला आणि त्याने हत्येची कबुली दिली. चौकशीत त्याने एप्रिल २०१७ मध्ये कैलासला रनाळा, वडोदाजवळील रेल्वेलाइन परिसरात मारहाण केल्याचे आणि अर्धमेल्या अवस्थेत त्याला रेल्वेखाली झोकून दिल्याची कबुली दिली. दुसऱ्याच आठवड्यात त्याने आरिफचीही हत्या करून मृतदेह नवीन कामठी हद्दीतील रेल्वेरुळावर टाकून दिला होता. दोन्ही घटनास्थळ त्याने दाखविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com