शिर कापून धडापासून केले वेगळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नागपूर - लकडगंजमधील इतवारी मालधक्‍का परिसरातील एका नाल्यात अनोळखी ३० ते ३२ वर्षांच्या युवकाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केले असून आरोपींनी केवळ धड नाल्यात फेकले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. अद्यापपर्यंत मृत युवकाची ओळख पटली नाही. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या युवकाचा खून की नरबळी? अशी चर्चा शहरभर सुरू आहे. 

गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मालधक्‍का परिसरातील झाडाझुडपांतून जाणाऱ्या नाल्यात एका युवकाचा मुंडके नसलेला मृतदेह एका युवकाला दिसला. त्याने भीतीने लगेच धूम ठोकली आणि चौकात नेऊन काही नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर हे पथकासह घटनास्थळावर गेले. किड्यांनी लदबदलेला युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठविण्यात आला. युवकाच्या अंगात कपडे नव्हते तर पॅंट मृतदेहाच्या पायाजवळ पडलेली होती. शिर नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली नाही. हा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आला असावा. धारदार शस्त्राने युवकाचे मुंडके कापण्यात आले असावे. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मुंडके सोबत नेले असावे. या परिसरात आजूबाजूला मुंडक्‍याचा शोध घेण्यात आला. मात्र, आढळून आले नाही. त्यामुळे तो युवक कोण? त्याचा खून कुणी केला? हत्याकांडाचा उद्देश काय? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो काढून शेजारील वस्तीत नागरिकांना दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तसेच शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांत मृतदेहाच्या वर्णनाची मिसिंग आहे का? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे.

रेल्वे मालधक्‍का कर्मचाऱ्यांची घेणार मदत
ज्या परिसरातून मृतदेह सापडला त्या परिसरात सामान्य नागरिकांची ये-जा नाही. घटनास्थळाच्या बाजूने दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे या परिसरात दारुड्यांचा वावर असावा. रेल्वेचा मालधक्‍कामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घटनेबाबत माहिती घेण्यात येणार आहे. परिसरातील काही मद्यपी तसेच मालधक्‍का कर्मचाऱ्यांचेही बयाण या प्रकरणात घेण्यात येणार असल्याचे ठाणेदार खांडेकर म्हणाले.