ग्रामपंचायत निवडणूक मतपत्रिकेने घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर -  लोकसभा व महापालिकेच्या निवडणुकांच्या निकालांमुळे ‘ईव्हीएम’बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांनी केली.

नागपूर -  लोकसभा व महापालिकेच्या निवडणुकांच्या निकालांमुळे ‘ईव्हीएम’बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांनी केली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ ऑक्‍टोबरला होणार आहेत. यासाठी ईव्हीएमचा वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु, ईव्हीएमवर अनेकांचा विश्‍वास नाही. अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. हे लक्षात घेता ग्रामपंचायतीची निवडणूक निष्पक्ष व्हाव्या यासाठी मतपत्रिकेचा वापर करावा. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर बरेच दिवस गावात तणावाचे वातावरण असते. ईव्हीएमने काही निकाल चुकीचे जाहीर झाल्यास संबंधित गावात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोपही होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेचासुद्धा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणे सर्वांच्या सोयीचे असल्याचे सलील देशमुख यांनी स्पष्ट केले. 

आक्षेप घेण्यास सुरुवात
ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रतिष्ठेची असते. जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्‍वर, काटोल, नरखेड, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा आदी तालुक्‍यांमध्ये निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. ईव्हीएमने निवडणुका होत असल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. काही तक्रारीसुद्धा आपल्याकडे आल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.