‘त्या’ मुलाचा ताबा डॉक्‍टर दाम्पत्याकडे कायम

‘त्या’ मुलाचा ताबा डॉक्‍टर दाम्पत्याकडे कायम

नागपूर - दत्तक दिलेला मुलगा परत द्यावा, अशी विनंती करणारी मूळ आईची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज करीत गेल्या अडीच वर्षांपासून पालनपोषण करणाऱ्या डॉक्‍टर दाम्पत्याकडे मुलाचा ताबा कायम ठेवला. मात्र, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी २ ते ५ वाजतादरम्यान मूळ पालकांना मुलाला भेटता येईल.  

दत्तक दिलेला मुलगा परत मागण्याचा हा अतिदुर्मिळ असा प्रसंग असून, यामुळे एका मुलाच्या ताब्यासाठी दोन मातांची न्यायालयीन लढाई सुरू होती. इक्‍बाल (नाव बदललेले) या अडीच वर्षांच्या मुलासाठीचा हा संघर्ष फारुक आणि फातिमा यांच्या प्रेमकथेतून सुरू झाला. फारुक आणि फातिमा यांचे एकमेकांवर प्रेम होते. भावी आयुष्याच्या स्वप्ने रंगवितानाच लग्नाच्या आणाभाका वगैरे घेण्यात आल्या. जुळलेल्या मनांसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. विवाहापूर्वीच झालेल्या संबंधातून इक्‍बालचा जन्म झाला. पारंपरिक आणि रुढीप्रिय अशा फातिमाच्या कुटुंबीयांसाठी हा फार मोठा धक्का होता. मात्र, त्यातून कसेबसे सावरत तिच्या पालकांनी फारुककडे लग्न करण्यासाठी आग्रह धरला असता त्याने नकार दिला. यामुळे फातिमा प्रचंड नैराश्‍यात गेली. उतारवयात मुलीमुळे होणारा अपमान सहन करावा की विवाहबाह्य संबंधातून  निर्माण झालेल्या नातवाचा सांभाळ करावा या द्विधास्थितीत असलेल्या फातिमाच्या वडिलांनी इक्‍बाल याला एका निपुत्रिक डॉक्‍टर दाम्पत्याला दत्तक दिले. 

समाजाच्या दृष्टीने अनौरस असलेल्या चिमुकल्या इक्‍बालच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सकाळ होत असतानाच पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात वादळ आले. मुख्य म्हणजे त्याच्या आयुष्यात वादळ आणणारे त्याचे मूळ माता-पिता आहेत. अडीच वर्षांनंतर फारुक याने फातिमासोबत विवाह केला असून, तो मुलाला आपलेसे करण्यास तयार झाला आहे. यामुळे फातिमाने ‘माझा मुलगा मला परत द्या’, अशी विनवणी न्यायालयाला केली. यावर निर्णय देत न्यायालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करून त्याचा ताबा डॉक्‍टर दाम्पत्याकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती, घरातील वातावरण आदी गोष्टी लक्षात घेत न्यायालयाने हा निर्णय दिला. डॉक्‍टर दाम्पत्यांतर्फे ॲड. मसूद शरीफ, ॲड. आदिल मिर्झा, मूळ पालकांतर्फे ॲड.  शबाना दिवाण तर मुलाच्या आजोबांतर्फे ॲड. पूनम मून यांनी बाजू मांडली. 

इक्‍बालचे आजोबाही प्रतिवादी
या संपूर्ण प्रकरणात स्वत:चे मुलीचे आणि नातवाचे आयुष्य व्यवस्थित राहणाच्या दृष्टीने इक्‍बाल याला परस्पर दत्तक देणाऱ्या आजोबांना फातिमाने या प्रकरणी प्रतिवादी होते. आईच्या परवानगीशिवाय इक्‍बालला दत्तक कसे काय दिले, असा प्रश्‍न तिने याचिकेत विचारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com