महापौरांच्या प्रभागात  अतिक्रमणाला पाठबळ

महापौरांच्या प्रभागात  अतिक्रमणाला पाठबळ

नागपूर - संपूर्ण शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असताना महापौरांच्या प्रभागात मात्र बिनबोभाटपणे अतिक्रमणधारकांची चंगळ सुरू आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या प्रभागातील प्रतापनगर चौक अतिक्रमणधारकांनी कवेत घेतला. मात्र, अधिकारीही कारवाईस टाळाटाळ करीत असल्याने अतिक्रमणधारकांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा संतप्त नागरिक करीत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी असलेल्या महापौरांच्या प्रभागातील माटे चौक ते प्रतापनगर चौकापर्यंत दुकानदारांनी रस्त्यांपर्यंत शेड उभारले आहेत. त्यातच फळविक्रेते, भाजी विक्रेत्यांसह किरकोळ साहित्य विक्रेत्यांनीही फुटपाथ कवेत घेतले. त्यामुळे वर्दळीचा हा रस्ता अरुंद झाला असून, वाहनधारकांना येथून चालताना कसरत करावी लागत आहे. शिवाय त्यांच्या डोक्‍यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील हा परिसर आहे. महापौर नंदा जिचकार यांचेही वास्तव्य याच भागात आहे. मात्र, याच भागात अतिक्रमणाने डोके वर केले आहे. प्रतापनगर चौकातील बसस्टॉपच्या समोर फळवाल्यांनी अतिक्रमण केले. अतिक्रमणामुळे बसही रस्त्यावर थांबवावी लागते. बस रस्त्यांवर थांबली की संपूर्ण वाहतूक ठप्प पडते. या फळविक्रेता फेरीवाल्यांना अटकाव केला तर ते नागरिकांना मारायला उठतात, अशी दादागिरी येथे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवर फिरणे कठीण झाले आहे. या संदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रार केली. राणाप्रतानगरचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्याकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. 

 महापौरांनी आम्ही कारवाई करतो, असे सांगून नागरिकांचीही बोळवण केली. पोलिसांनी तर दखलच घेतली नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. अतिक्रमण पथकाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करून निघून जातात. केवळ नोटीस बजावून औपचारिकता पार पाडली जाते. कारवाईच्या नावावर बोंब आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची हिंमत वाढली आहे. संध्याकाळी तर दुर्गादेवी मंदिर ते प्रतापनगर चौकापर्यंत पूर्ण रस्ता या फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. यावर महापालिकेने त्वरित बंदोबस्त केला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. 

ऑटोचालकांची दादागिरी 
प्रतापनगर चौकातील बसथांब्याजवळ ऑटोरिक्षाचालकांची दादागिरी सुरू आहे. नियमानुसार ऑटो स्टॅण्ड बसथांब्यापासून १०० मीटर दूर असायला पाहिजे. परंतु, ऑटोचालक बसथांब्याजवळच ऑटो लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. आरटीओ अधिकारी शरद जिचकार याच परिसरात वास्तव्यास असून, त्यांचे दररोज याकडे लक्ष जाते. परंतु, ते तसेच पोलिस, महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे. 

अधिकाऱ्यांकडून वसुली 
येथील अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जात नाही. त्यांना येथील काही माजी नगरसेवक व राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यानेच कारवाई होत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. काहींनी तर अधिकारी अतिक्रमणधारकांकडून वसुली करीत असल्याची शक्‍यताही व्यक्त केली. अधिकारी व राजकीय नेत्यांमुळे प्रतापनगर चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com