खाकी वर्दीकडून होणारा पंचनामा नेत्रदानात अडसर

रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - अंधांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, त्यांच्या नजरेत उजेड पेरला जावा, हा उदात्त हेतू मेडिकलमध्ये मृत्यू पावलेले अनिल सुटे यांच्या नातेवाइकांचा होता. परंतु, पोलिस पंचनामा वेळेत पूर्ण न झाल्याने मृताचे नेत्रदान करण्याची नातेवाइकांची इच्छा मारली गेली. 

नागपूर - अंधांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, त्यांच्या नजरेत उजेड पेरला जावा, हा उदात्त हेतू मेडिकलमध्ये मृत्यू पावलेले अनिल सुटे यांच्या नातेवाइकांचा होता. परंतु, पोलिस पंचनामा वेळेत पूर्ण न झाल्याने मृताचे नेत्रदान करण्याची नातेवाइकांची इच्छा मारली गेली. 

सुटे यांचा मृत्यू गुरुवारी सकाळी ८ वाजता झाला. नातेवाइकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. अपघाती निधन असल्याने पोलिस पंचनामा आवश्‍यक आहे. अजनी पोलिसांना खबर दिली. पंचनामा झाल्याशिवाय नेत्रदान होणे अशक्‍य... तास दोन तास नव्हे, तर तब्बल सहा तास उलटून गेल्याने सुटे यांचे नेत्रदान होऊ शकले नाही. खाकी वर्दीकडून वेळेत पोलिस पंचनामा झाला असता तर दोन अंधांच्या डोळ्यांत दाटलेला काळोख दूर करता आला असता. खाकी वर्दीच ठरली नेत्रदानात अडसर... 

ही व्यथा नेत्रदान करण्याची इच्छा असलेल्या शेकडो मृतांच्या नातेवाइकांची आहे.  पोलिस पंचनामा करण्यासाठी कधी-कधी रात्र उलटून जाते; परंतु पंचनामा होत नाही. अशा अनेक बाबींमुळे नेत्रदान चळवळ वेग धरत नाही.  

मेडिकलमध्ये दरवर्षी चार हजारांवर तर मेयोत अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. राज्यात ही संख्या तीन लाखांवर आहे. अपघात, संशयित मृत्यूनंतर पोलिस पंचनामा कायद्याने बंधनकारक आहे. विशेषतः अपघात रात्री होतात. अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतर लगेच तासाभरात पंचनामा झाल्यास नातेवाइकांच्या इच्छेनुसार नेत्रदान शक्‍य आहे. मात्र, मृत्यूची नोंद रात्री ९ वाजता झाल्यानंतर रात्रभर मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवला जातो. पोलिस पंचनामा दुसऱ्याच दिवशी होतो. गुरुवारी सुटे यांचा मृत्यू झाल्यानंतर दोन तासांत पंचनामा झाला असता, तर नातेवाइकांनी बाळगलेली नेत्रदानाची इच्छा मेडिकलच्या डॉक्‍टरांनी पूर्ण केली असती. खाकी वर्दीकडून पंचनामा वेळेत न झाल्याने दोन अंधांच्या नरजेच्या टापूत असलेले सृष्टीचे सौंदर्य संधी हुकल्याने बघता आले नाही.

शवविच्छेदनावेळी नेत्रदान सक्तीचे  
देशात दरवर्षी ७५ लाख मृत्यू होतात. त्यातील केवळ २३ हजार व्यक्ती नेत्रदान करतात. म्हणजे ०.४ टक्के लोक मृत्यूनंतर नेत्रदान करतात. शवविच्छेदन होत असलेल्या व्यक्तीसाठी सक्तीच्या नेत्रदानाचा कायदा केल्यास पोलिसांनाही पंचनामा वेळेत पूर्ण करणे सक्तीचे होईल. यामुळे शेकडो अंधांच्या डोळ्यांत प्रकाश पेरला जाईल. सध्या महाराष्ट्रात दोन लाख रुग्णांना नेत्रांची गरज आहे. यात २५ हजार लहान मुलांचा समावेश आहे. विदर्भात अद्याप २ हजार ५० व्यक्ती बुबुळाच्या प्रतीक्षेत आहेत. 

प्रत्येक अंधाला जग पाहता यावे, यासाठी मृत्यूनंतर नेत्रदान करावे. अपघातात मृत्यू पावलेल्यांचे नेत्रदान सहज स्वीकारता येते. या नेत्रदानाची सक्ती व्हावी. विशेष असे की, शवविच्छेदनाची सक्ती करण्याचा कायदा व्हावा. पोलिसांकडून मेडिको लीगल केसेसमध्ये होणारा पोलिस पंचनामा वेळेत व्हावा. 
- डॉ. अशोक मदान,  नेत्ररोगतज्ज्ञ, विभागप्रमुख,  मेडिकल (नेत्ररोग विभाग), नागपूर. 

मेडिकल ः दरवर्षी ४ हजार शवविच्छेदन 
मेयो ः दरवर्षी २ हजार ५०० शवविच्छेदन
विदर्भातील रुग्णालयांत ः दरवर्षी २ हजार शवविच्छेदन