दरोड्याच्या प्रयत्नातूनच बहादुऱ्यात गोळीबार

दरोड्याच्या प्रयत्नातूनच बहादुऱ्यात गोळीबार

नागपूर - बहादुऱ्यातील गोळीबार प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश आले. दरोड्याच्या प्रयत्नात हा घटनाक्रम घडल्याचे आणि धार्मिक कार्यात मदत करणाराच घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या असून, एक फरार आहे. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रमाची माहिती दिली. 

गजेंद्र मरकाम (२६) रा. वाठोडा, सूर्यप्रकाश ऊर्फ सूरज तिवारी (३४) रा. मिलिंदनगर, बाळाभाऊपेठ, राजेश जाट (२६) रा. खरबी, ब्रिजपाल ठाकूर (३५) रा. नर्मदा कॉलनी, रोनित उमाठे (२७) रा. सुरेंद्रगड अशी आरोपींची नावे आहेत. अलीम नावाचा आरोपी फरार आहे. १४ नोव्हेंबर रोजी आरोपींनी बहादुरा फाटा, शिवमंदिरजवळील रहिवासी संजय नगरधने यांच्या घरावर धावा करीत अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी संजय यांच्या पत्नीच्या पायाला लागली तर मुलाच्या पोटावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले होते. घटनेत परिचित व्यक्तीचा समावेश असल्याचा कयास पोलिसांनी बांधला होता. तपासात गजेंद्र हा नगरधने यांच्या घराजवळील शिवमंदिरात होणाऱ्या माहाशिवरात्रीच्या कार्यक्रमात मदत करीत असल्याचे पुढे आले. गुप्त बातमीदारांच्या महितीवरून पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. आरोपींकडून पिस्तूल व इनोवा कार जप्त करण्यात आली.  

असा शिजला कट 
संजय यांनी दीड कोटीत शेती विकल्याने त्यांच्या घरीच मोठी रक्कम असल्याचा विश्‍वास गजेंद्रला होता. तो इलेक्‍ट्रिकचे काम करतो. हेच काम करणारे सूरज आणि राजेश यांच्यासोबत ओळख होती. गजेंद्रने नगरधने यांच्याकडे दरोडा टाकण्याची योजना आखली. सूरज व राजेशलाही कटात सहभागी करून घेतले. घटनेच्या आदल्या दिवशी तिघांनी रेकी केली. अधिक साथीदारांची गरज त्यांना जाणवल्‍याने अलीम, ब्रिजपाल, रोनित यांनाही सोबत घेतले. ब्रिजपालने भावाची इनोवा गाडी आणली. याच गाडीत बसून आरोपी बहादुरा येथे पोहोचले. गजेंद्र आणि ब्रिजपाल गाडीतच बसले होते. सूरजकडे पिस्तुल व राजेश आणि अलीम यांच्याकडे चाकू होते. रात्री संधी मिळताच घरात शिरून शस्त्राच्या धाकावर दरोडा घालायची त्यांची योजना होती.

कुटुंबीयांच्या धाडसामुळे फसला ‘प्लॅन’
आरोपी मध्यरात्री मंदिरामागे जाऊन लपले. मात्र, आवाज आल्याने संजय यांची मुलगी वैष्णवी एकटीच खाली आली. आरोपी दिसल्याने ती किंचाळली. यामुळे राजेशने तिचे केस पकडून गळ्याला चाकू लावला. तिला ओलीस धरून आरोपी घरात शिरणार होते. परंतु, अन्य सदस्यांनी बाहेर येत आरडाओरड केल्याने राजेशने पिस्तुलीतून तीन राऊंड फायर केले. त्याचवेळी अलीमने मुलावर चाकूने वार केला. यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड करण्यासह आरोपींना प्रतिकार केला. यामुळे आरोपींना पळण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com