ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोलपंपांवर मकोका - गिरीश बापट

ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोलपंपांवर मकोका - गिरीश बापट

नागपूर - मायक्रोचीपद्वारे ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोलपंपांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्‍टिव्हीटी) कायदा तसेच मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले.

पेट्रोलियम कंपन्यांच्या पंपांवर मायक्रोचीपद्वारे ग्राहकांची लूट होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून प्रतिपेट्रोलपंप महिन्याला सरासरी आठ लाख रुपये अनधिकृत मार्गाने कमाई करीत आहे. एखाद्या पेट्रोल पंपावर छापा पडला तर रिमोट कंट्रोलद्वारे चीप डिॲक्‍टीव्हेट करण्यात येते. अशापद्धतीचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या राज्यात सहा कंपन्या आहेत.

राज्य सरकारने केंद्राशी बोलून फसवणूक करणाऱ्या पंपचालकांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. त्यावर गिरीश बापट म्हणाले, ‘उत्तर प्रदेशच्या छाप्यात ठाण्याचा माणूस सापडल्यावर राज्य सरकारला क्‍ल्यू मिळाला आणि त्यानंतर कारवाईचे सत्र सुरू केले. यामध्ये १८९ पेट्रोलपंप तपासले तेव्हा ९८ पंपांवर छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. यापैकी ५९ पंपांवरील सॅम्पल लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले. त्याचा अहवाल सरकारकडे आला असून सर्व दोषी असल्याचे आढळले. केंद्र सरकारला कळवून ८ पेट्रोल पंप बंद करण्यात आले आणि ३३ लोकांना अटक करण्यात आली. यात चौदा चालक-मालक आणि नऊ खासगी टेक्‍निशियन्स आहेत. मात्र, यासंदर्भातील कारवाईचे सत्र सुरू असताना ५७ पेट्रोलपंपमालक न्यायालयात गेले आणि स्थगिती मिळविली. 

राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल  अनिल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.’ ऑडिट रिपोर्टमध्येदेखील चालक-मालक  आणि कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याची स्वाक्षरी असल्याशिवाया तो मंजूर करण्यात येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. गेली अनेक वर्षे या खात्याकडे दुर्लक्ष झाले असले तरी यापुढे दोषींवर एमपीडीए कायदा किंवा मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com