अधिष्ठात्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या सहयोगी प्राध्यापकांना बदलीचा डोस न देता प्राध्यापक आणि अधिष्ठात्यांच्या बदल्यांचा फतवा गुरुवारी (ता. ८) धडकला. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. पल्लवी सापळे यांची मेयोच्या अधिष्ठातापदी बदली झाली. 

नागपूर - वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या सहयोगी प्राध्यापकांना बदलीचा डोस न देता प्राध्यापक आणि अधिष्ठात्यांच्या बदल्यांचा फतवा गुरुवारी (ता. ८) धडकला. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. पल्लवी सापळे यांची मेयोच्या अधिष्ठातापदी बदली झाली. 

एकाच ठिकाणी १५ वर्षांची सेवा असलेल्या सहयोगी प्राध्यापकांची यादी महिनाभरापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केली होती. यांच्या बदलीचे संकेत होते. परंतु, अचानक प्राध्यापक  आणि अधिष्ठात्यांची बदली झाल्याने साऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सोलापूरच्या शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. राजाराम पोवार यांची लातूर येथे अधिष्ठातापदी बदली झाली. डॉ. सुनील घाटे यांना सोलापूर येथे अधिष्ठातापदी नियुक्‍त केले. डॉ. अशोक राठोड यांना यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून थेट कोल्हापुरातील  वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर हलविण्यात आले. त,ड्डिॉ. चंद्रकांत मस्के यांना औरंगाबादेतून नांदेड शासकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर बदली देण्यात आली. डॉ. काननबाला येळीकर यांना नांदेडहून औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी नियुक्‍त केले. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना नागपूर येथील मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून बदली दिली. मेडिकलमधील डॉ. रा. भा. सूरपाम यांची चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बदली झाली. 

काही महिन्यांपासून सुपर, मेडिकल, मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभागाशी संबंधित डॉक्‍टरांच्या बदल्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागासह काही नेत्यांना न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या  बदल्यांमध्ये रस असल्याचे दिसून येते. मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित यांची मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची बदली यवतमाळ येथे केली. ते न्यायवैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.  सुपरमधून डॉ. श्रीगिरीवार यांच्या ओएसडी पदावर गोंदिया मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापकाचे पुनर्वसन करण्याचे मनसुबे एका नेत्याचे होते. परंतु, न्यायालयाने सेवाज्येष्ठता यादीनुसार सुपरचे पद भरण्याचे निर्देश दिल्याने हा गेम फसला.  यामुळे या प्राध्यापकाला मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाशिवाय पर्याय नसल्याची चर्चा मेयोत रंगली आणि डॉ. दीक्षित यांची बदली हमखास होईल, असे भाकीतही येथे केले गेले. जे खरेही ठरले. दोन वर्षे होण्याआधीच डॉ. दीक्षित यांची बदली झाली. डॉ. केवलिया यांना मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभाग दिला नाही. मेयोच्या रिक्‍त जागेवर लवकरच मंत्रिमहोदय गोंदियातील प्राध्यापकांची बदली करतील, अशी चर्चा आहे.