खापरखेडा पोलिस ठाण्यात आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

खापरखेडा - येथील पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कंट्रोल युनिटच्या कक्षाला गुरुवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. महत्त्वाच्या दस्तऐवजासह जवळपास २.७५ लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात खळबळ उडाली. 

खापरखेडा - येथील पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कंट्रोल युनिटच्या कक्षाला गुरुवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. महत्त्वाच्या दस्तऐवजासह जवळपास २.७५ लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात खळबळ उडाली. 

खापरखेडा पोलिसठाणे परिसरात सीसीटीव्ही कंट्रोल युनिटचे कक्ष असून या कक्षात स्थानिक गुन्हे व वाहतूक शाखेचे महत्त्वाचे दस्तऐवज ठेवलेले होते. शिवाय संपूर्ण खापरखेडा शहरात लागलेले सीसीटीव्ही कंट्रोलिंग याच कक्षातून केले जात होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करून परत पोलिस ठाण्यात आले. त्यांना सीसीटीव्ही कंट्रोल युनिटच्या कक्षातून धूर निघत असल्याचे दिसले. कक्षाची राजकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. कक्षाच्या आत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे आढळून आले. कक्षाच्या आत ठेवलेले साहित्य व कार्यालयीन रेकॉर्ड जळत असल्याचे दिसून आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला. खापरखेडा परिसरात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू असल्यामुळे ग्रामीण पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली आहे. शिवाय पोलिस ठाणे दैनंदिनी व बिनतारी संदेश संभाळण्यासाठी चोवीस तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येतात. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पोलिस मुख्यालयातून आलेल्या १० कर्मचाऱ्यांशिवाय खापरखेडा पोलिस ठाण्यात इतर १० कर्मचारी ड्यूटीवर होते.