दोन माळ्यांचे घर ‘पाच मजली’ कर

दोन माळ्यांचे घर ‘पाच मजली’ कर

नागपूर - मालमत्तेचे सर्वेक्षण करणाऱ्या सायबरटेक या कंपनीच्या घोळाचे एक-एक किस्से पुढे येत आहेत. नेहरूनगर झोनमधील शक्‍तीमातानगरातील एका मालमत्ताधारकाच्या मालमत्तेतच वाढ केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सायबरटेकने दोन मजल्यांच्या घराची पाच मजल्यांचे घर म्हणून नोंद केल्याने संबंधितांवर २३ पटींनी मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. अशा प्रकारचे एक नव्हे, अनेक प्रकरणे असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते कार्यालयात मालमत्ताधारकांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.

सायबरटेकचा घोळ आणि महापालिकेने मालमत्ता करात केलेल्या वाढीने नागपूरकरांचे कंबरडे मोडले आहे. मालमत्ता करात झालेल्या वाढीला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी तीव्र विरोध केला. मालमत्ता कर वाढीची देयके नागरिकांपर्यंत पोहोचली असून, आता त्यांच्यातही संताप व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक गुडधे पाटील, विरोधी पक्षनेते वनवे यांनी मालमत्ताधारकांना करासंदर्भात विरोधी पक्षनेते कार्यालयात तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते कार्यालयात मालमत्ता करासंदर्भात तक्रारीसाठी नागरिकांनी गर्दी केली. आज २२ नागरिकांनी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याकडे वाढीव मालमत्ता कराची देयके, घराचा नकाशा व निवेदन दिले. या तक्रारकर्त्यांपैकी एक असलेले शक्तीमातानगरातील नत्थू महादेवराव मौंदेकर यांच्या मालमत्तेतही सायबरटेकने वाढ केली आहे.

शक्तीमातानगरात दोन मजल्यांचे घर असून, सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सायबरटेकच्या कर्मचाऱ्यांनी पाच मजल्यांची नोंद केल्याचे देयकांवरून दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर एकही भाडेकरू नसताना घरांमध्ये भाडेकरू असल्याची नोंद केल्याचे नत्थू मौंदेकर यांनी सांगितले. महापालिकेने मालमत्ता कर आकारणीसंदर्भात दिलेल्या सूत्रानुसार एकूण बांधकामाच्या क्षेत्रफळाची कर आकारणी ४ हजार ६१९ अपेक्षित होती. परंतु महापालिकेने १९ हजार ६५६ रुपयांची कर आकारणी केली. मागील २०१६-१७ या वर्षात ८७० रुपयांचे देयक महापालिकेने पाठविले होते. मात्र, २०१७-१८ या वर्षासाठी २० हजार ८०० रुपये आकारणी करण्यात आली असून, ही २३ पट वाढ असल्याचे मौंदेकर म्हणाले.

संतापाची लाट 
शक्तीमातानगरातील सुनीता धांडे यांच्याबाबतही हाच प्रकार उघडकीस आला. २०१६-१७ या वर्षासाठी त्यांनी १००६ रुपये मालमत्ता कर दिला. २०१७-१८ या वर्षासाठी त्यांना १५ हजार ८१९ रुपयांचे देयकपाठविण्यात आले. ही वाढ पंधरा पट आहे. याशिवाय राजेंद्र केशवराव निमजे यांचे दोन मजली घर असून, सायबरटेकने चार मजल्यांची नोंद केली. त्यांनाही मागील वर्षी १००० रुपये तर यंदा १४ हजार ८६६ रुपयांचे देयक पाठविण्यात आले आहे. दोघांनीही महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला. त्यामुळे महापालिकेविरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे. 

भाजप नगरसेविकेलाही फटका 
‘सायबरटेक’च्या घोळाचा सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेलाही फटका बसल्याचे समजते. लकडगंज झोनमधील एका प्रभागातील भाजप नगरसेविकेच्या घराचेही चुकीचे सर्वेक्षण करण्यात आले. या नगरसेविकेच्या घरी तीन भाडेकरू असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे संतप्त होऊन या नगरसेविकेच्या पतीने महापालिका गाठली. अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. आताच घरी चला अन्‌ वास्तव बघा, असे आव्हान नगरसेविकेच्या पतीने अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी अखेर सुधारणेचे आश्‍वासन दिले.

मागितले पाच हजार 
‘सायबरटेक’च्या कर्मचाऱ्याने दोन मजली घर असल्याची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप नत्थू मौंदेकर या वृद्ध नागरिकाने केला. पाच हजार न दिल्याने दोन मजली घराची नोंद पाच मजली अशी करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता करातही मोठी वाढ झाली. महापालिकेने पुन्हा माझ्या घराची मोजणी करून योग्य बांधकामावर कर आकारणी करावी, अशी मागणीही मौंदेकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com