विद्यापीठाच्‍या सिनेट निवडणुकांचा बिगुल 

विद्यापीठाच्‍या सिनेट निवडणुकांचा बिगुल 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमधील शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि विद्वत परिषदेच्या निवडणुकांसाठी सदस्यांना तीन नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरावयाचे आहे. त्यानुसार या सदस्यांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याची माहिती कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी दिली. सिनेटमधील पदवीधर गटाच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बी. फॉर्मसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ८३ सदस्यांचा समावेश आहे. त्यात ४८ सदस्य निवडून तर ३५  सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल. निवडणुकीतून येणाऱ्या सदस्यांमध्ये दहा पदवीधर, दहा शिक्षक, तीन विद्यापीठ शिक्षक, दहा प्राचार्य आणि सहा सदस्य महाविद्यालय व्यवस्थापनातील सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्वत परिषदेतील आठ सदस्यांचा समावेश आहे. त्यानुसार प्रक्रियेत प्राचार्यांसाठी २०० मतदारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १६७ मतदारांची नावे  निश्‍चित करण्यात आली. व्यवस्थापन प्रतिनिधींसाठी ३११ पैकी १९४ मतदारांची नावे निश्‍चित झाली. शिक्षक गटात ५ हजार ५८२ पैकी ५ हजार ३७२ मतदारांची नोंदणी करण्यात आली. विद्यापीठ शिक्षकांसाठी नोंदणी करणाऱ्या ३७२ शिक्षकांपैकी सुनावणीअंती १६३ मतदारांची नोंदणी ग्राह्य धरण्यात आली. विद्वत परिषदेतील चार विद्याशाखेतून निवडुन देण्यात येणाऱ्या आठ प्रतिनिधींसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठातील नोंदणी केलेल्या ५ हजार ५३५ मतदारांचा समावेश आहे. अभ्यासमंडळासाठी महाविद्यालयातील २ हजार ४६ विभागप्रमुखांची नोंदणी करण्यात आली आहे. विद्यापीठात ७३ अभ्यासमंडळ असून १२ बोर्डांसाठी नावच आले नाही. यासाठी ३ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजतापर्यंत नामनिर्देशन द्यायचे आहे. यानंतर चार ते पाच नोव्हेंबरदरम्यान छाननी तर सहा नोव्हेंबरला तात्पुरती यादी लावण्यात येईल. आठ नोव्हेंबरपर्यंत अपील तर ११ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रकाशित होईल. १३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना निवडणुकांमधून माघार घेता येईल. मतमोजणी २७ नोव्हेंबरला निवडणुकांची मतमोजणी करण्यात येणार असल्याचे कुलसचिव म्हणाले.  

एका लाखावर  पदवीधर मतदार
विद्यापीठाद्वारे पदवीधर नोंदणीची १२ जुलैपासून सुरुवात करण्यात आली. पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये १६ हजार २७७ अर्जांच्या प्रती जमा करण्यात आल्या.  याशिवाय २०१० पर्यंत ८५ हजार ५७६ पदवीधरांची नोंदणी आणि २०१५ साली झालेल्या विशेष नोंदणीत ३ हजार ३२५ पदवीधरांची नोंदणी करण्यात आली. यानुसार एकूण पदवीधरांची  नोंदणी एक लाख ५ हजार १७८ वर गेली आहे. गोंडवाना विद्यापीठाने पदवीधरांची माहिती उशिरा दिल्याने प्रक्रियेस वेळ झाला असून ती यादी बाजूला ठेवत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बी फॉर्मची प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिवांनी दिली. त्यानुसार जानेवारीत पदवीधर गटातील दहा जागांसाठी मतदान होणार आहे. 

असे आहेत मतदार 
प्राचार्य (१० जागा )- १६७, व्यवस्थापन प्रतिनिधी (६ जागा )- १९४, शिक्षक (१० जागा)- ५,३७२, विद्यापीठ शिक्षक (३ जागा) - १६३, विद्वत परिषद (आठ जागा) - ५, ५३५ 

अशा आहेत तारखा
३ नोव्हेंबर -  नामनिर्देशन सादर करणे
४ आणि ५ नोव्हेंबर - अर्जाची छाननी 
६ नोव्हेंबर-  तात्पुरती यादी लावणे 
८ नोव्हेंबर- अपील  सादर करणे 
११ नोव्हेंबर - अंतिम यादी प्रकाशित करणे 
१३ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेणे
१४ नोव्हेंबर - मतदार यादी प्रकाशित करणे
२५ नोव्हेंबर - निवडणुका 
२७ नोव्हेंबर - मतमोजणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com