गडकरी यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

शहा, पवार, सुशीलकुमार येणार

शहा, पवार, सुशीलकुमार येणार
नागपूर - भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. 27) कस्तुरचंद पार्कवर भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसात वाजता प्रारंभ होणाऱ्या मुख्य सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून गडकरी यांना एक कोटी रुपयांची थैली दिली जाणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह देशाच्या विविध भागातील आमदार, खासदार, मंत्री तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील.
गडकरी 27 तारखेला एकसष्टाव्या वर्षात पर्दापण करीत आहेत. यापैकी चाळीस वर्षे त्यांनी सार्वजनिक तसेच राजकीय जीवनात घालविली आहेत. भाजपचे एक सामान्य कार्यकर्ते ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या मनोगतातून सर्वांना प्रेरणा मिळावी तसेच भावना जाणून घेता याव्या यासाठी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले असल्याचे नितीन गडकरी गौरव समारोह समितीचे संयोजक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहसंयोजक गिरीश गांधी यांनी सांगितले.

सुदेश भोसले, वैशाली सामंत गाणार
शनिवारी साडेपाच वाजता गायक सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांच्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल. सत्काराच्या मुख्य सोहळ्याला सायंकाळी साडेसात वाजता प्रारंभ होईल. सोहळ्याला किमान 50 हजार नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

एक कोटीची थैली
वाढदिवसानिमित्त गडकरी यांना एक कोटी एक लाख रुपयांची थैली देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांनी प्रत्येकी एक लाख रुपये दिले आहेत. हा निधी शंभर सेवाभावी संस्थांना दिला जाणार आहे. संस्थांच्या नावांची घोषणा गडकरी करणार आहेत.

"सकाळ'चा "कर्मयोगी' विशेषांक
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शनिवारी (ता. 27) त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त "सकाळ'ने "कर्मयोगी' हा विशेषांक प्रकाशित केला आहे. "कर्मयोगी' विशेषांकात गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे मान्यवरांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

हार, शाल आणू नका
गडकरी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मात्र हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणू नये असे आवाहन पालकमंत्री तसेच गौरव समितीचे संयोजक चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

येथे करा पार्किंग
बिशप कॉटन मैदान, महापालिका मुख्यालय, जुने कॅथलॅटिक चर्च, सरपंच भवन, हिस्लॉप कॉलेज, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, तिडके महाविद्यालय, टायगर गॅप ग्राउड, सदर, स्टेट बॅंक मुख्यालय, रेल्वे डीआरएम ऑफिस, सेंट उर्सुला हायस्कूल, ऑल सेंट कॅथेड्रल चर्च, एनआयटी, सीएनआय चर्च, भारत टॉकीज.

वाहतुकीत बदल
लिबर्टी ते एलआयसी चौक, पाटणी ऑटोमोबाईल चौक ते एलआयसी चौक, कन्नमवार पुतळा ते आरबीआय चौक, फॉरेस्ट ऑफिस ते आरबीआय चौक, झीरो माइल ते आरबीआय चौक, जयस्तंभ चौक ते श्री मोहिनी कॉम्प्लेक्‍स या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर
गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने वेगवेगळ्या प्रभागांत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच आरोग्य शिबिरही घेण्यात येणार आहे. काही प्रभागांमध्ये झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप तसेच रेशन कार्ड वितरित केले जातील.