पोलिस पहिल्याच दिवशी अर्धपोटी

नागपूर - वरणभातावर भूक भागविताना मोर्चा पॉइंटवरील पोलिस कर्मचारी.
नागपूर - वरणभातावर भूक भागविताना मोर्चा पॉइंटवरील पोलिस कर्मचारी.

नागपूर - हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी अर्धपोटी राहण्याची वेळ आली. त्यामुळे विशेष करून महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. मोर्चा पॉइंटवर बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सकाळचे जेवण दुपारी तब्बल तीन वाजता मिळाले. याप्रकरणाची पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेतली. पैसे वाचविण्यासाठी जेवण कमी बनविणाऱ्या कंत्राटदारांची पोलिस आयुक्‍तांनी हकालपट्टी केली.
हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था विशेष शाखेच्या वतीने केली आहे. पोलिस आयुक्तांनी ७ कॅटरर्सला ठेका दिला असून, केवळ १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पोलिस कर्मचाऱ्यांना १०० रुपयांमध्ये १० कूपन दिले आहे. जेवणामध्ये पोळी, भाजी, भात, दोन भाज्या, लोणचे, पापड आणि सलाद देण्यात येणार होते. मात्र, सोमवारी टेकडी मोर्चा पॉइंटवर सुरुवातीला अनेक कर्मचाऱ्यांना भरपेट जेवण मिळाले. मात्र, कंत्राटदाराने हात आखडता घेत जेवण कमी गेल्याचे कारण पुढे केले.

टेकडी पॉइंटवरील बंदोबस्तातील पोलिस कर्मचाऱ्यांवर ओढवलेला प्रसंग बिकट होता. यासंदर्भात ‘सकाळ’ प्रतिनिधीने जेवण करीत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला विचारणा केली असता डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, त्याही परिस्थितीत त्या महिला कर्मचाऱ्याने चेहऱ्यावर स्मित हास्य करीत प्रशासनाविरुद्ध बोलण्याचे टाळले.

अन्‌ ती रडू लागली
टेकडी मोर्चा पॉइंटवर तीन वाजता महिला पोलिस कर्मचारी जेवण करीत होती. तिच्या ताटात केवळ भात आणि वरण होते. अवेळी जेवण आणि तेसुद्धा केवळ भात-वरण असल्यामुळे ती पाण्याच्या घोटासोबत कसेबसे खात होती. तिला जेवणाबाबत विचारणा केली असता रडू कोसळले. ‘दादा सकाळपासून बंदोबस्तात आहे...पोळी आणि भाजीसुद्धा नाही. मात्र, भात खाऊन दिवस काढावा लागत आहे’ एवढे बोलून ती ढसाढसा रडायला लागली. लगेच ती डोळे पुसून  पाणी पिऊन बंदोबस्तावर रुजू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com