‘डेंजर झोन’मधून बाप्पांचे आगमन 

राजेश प्रायकर 
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - गणेशोत्सवाची शहरात तयारी सुरू झाली असून एका बाजूनेच तयार झालेले सिमेंट रस्ते व दुसऱ्या बाजूने खड्ड्यात गेलेला रस्त्यातून बाप्पाला घरापर्यंत, गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापर्यंत कसे आणायचे? असा प्रश्‍न पडला आहे. शहरातील अनेक डांबरी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असून त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नसल्याचेही चित्र शहरात आहे. त्यामुळे या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून गणेशोत्सवापूर्वी कृष्णा जन्माष्टमीसाठी कन्हैयालाही घरापर्यंत ‘डेंजर झोन’मधून यावे लागणार असल्याचे दिसून  येत आहे.  

नागपूर - गणेशोत्सवाची शहरात तयारी सुरू झाली असून एका बाजूनेच तयार झालेले सिमेंट रस्ते व दुसऱ्या बाजूने खड्ड्यात गेलेला रस्त्यातून बाप्पाला घरापर्यंत, गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापर्यंत कसे आणायचे? असा प्रश्‍न पडला आहे. शहरातील अनेक डांबरी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असून त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नसल्याचेही चित्र शहरात आहे. त्यामुळे या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून गणेशोत्सवापूर्वी कृष्णा जन्माष्टमीसाठी कन्हैयालाही घरापर्यंत ‘डेंजर झोन’मधून यावे लागणार असल्याचे दिसून  येत आहे.  

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेचीही कामे सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उड्डाणपूल तसेच मेट्रो रेल्वेची कामे बॅरिअर्स लावून नियोजनबद्ध पद्धतीने होत असताना महापालिकेला नियोजन कशाशी खातात? हेच माहीत  नसल्याचे शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अभियंते,  कनिष्ठ अभियंते अधिकारी नेमके काय करतात? या प्रश्‍नाचे नागपूरकरांना वर्षानुवर्षांपासून उत्तर मिळाले नाही. यंदाही याच अधिकाऱ्यांमुळे बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात होऊ घातलेले सिमेंट रस्ते एका बाजूने तयार झाले आहे. शताब्दी चौक ते रामेश्‍वरीपर्यंतचा सिमेंट रस्ता एका बाजूने तयार झाला असून त्यावरून वाहतूकही सुरू झाली. रामदासपेठेत कल्पना बिल्डिंगच्या थोडे पुढे गेल्यास विद्यापीठाच्या ग्रंथालयापर्यंतचा सिमेंट रस्ता एका बाजूने तयार झाला. गांधीसागर ते कॉटन मार्केटपर्यंतचा सुभाष रोडवर सिमेंट रस्त्याची कामे अनेक दिवसांपासून सुरू आहे. ग्रेट नाग रोडवर रेल्वे पूल ते आशीर्वाद टॉकीजपर्यंत रस्ता नाहीच, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका बाजूने सिमेंट रस्त्यांवरून सहज प्रवास करता येत असला तरी एका बाजूने नागरिकांना नको ते सिमेंट रस्ते, परंतु असलेल्या डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील डांबरी रस्त्यांवरही एलॲण्डटी तसेच इतर कंपन्यांनी खोदकाम केले, परंतु पुनर्वसनाचा दर्जा निकृष्ट असल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. टीबी वॉर्ड चौक ते वंजारीनगर जलकुंभापर्यंतच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून पुढे तुकडोजी पुतळा चौकापर्यंत सारखीच स्थिती आहे.

अंतर्गत रस्ते गेले खड्ड्यात 
शहरातील अनेक वस्त्यांतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. प्रतापनगर, गणेश कॉलनी, सेंट्रल एक्‍साइज कॉलनी, टेलिकॉमनगर, खामला, स्वावलंबीनगर, मॉडर्न सोसायटी, गोपालनगर, चंद्रमणीनगर, भगवाननगर, प्रगती कॉलनी, कैलासनगर, हावरापेठ, बिडीपेठ, मोठा ताजबाग, आशीर्वादनगर, जोगीनगर ते जयभीमनगर, चॉक्‍स कॉलनी, मेडिकल चौक ते क्रीडा चौक, हनुमाननगर, चंदननगर, हेडगेवार मार्ग, गजानन चौक ते संगम टॉकीज, हसनबाग ते वर्धमानगर, कळमना, पारडी, नारा, नारी या वस्त्यांतील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली असून नागरिकांना कसरत करावी लागत आहे. 

नागरिकांमध्‍ये मनपाविरुद्ध रोष
सिमेंट रस्त्यांच्या निविदा निघाल्या असून कामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेला सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामांच्या ठिकाणी खड्डे बुजविण्यावर खर्च करणे परवडणारे नाही. एखाद्याचा बळी गेला तरी महापालिका काहीही करणार नाही, हे गेल्या काही दिवसांतील कामाच्या पद्धतीवरून दिसून येत आहे. परंतु, कंत्राटदाराला सिमेंट रस्त्याची कामे वेगाने करण्याबाबत इशारा देणे किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासही महापालिका पुढाकार घेत नसल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी का घातले जात आहे, असा सवालही आता नागरिक करीत आहेत. 

सिमेंट रस्त्यांचे एका बाजूचे काम झाले असले, तरी जोपर्यंत काठावर आयब्लॉक लावण्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या बाजूचे काम करणे शक्‍य नाही. जे कंत्राटदार सर्व कामे पूर्ण होऊनही विलंब करीत आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 
- विजय बनगिनवार, मुख्य अभियंता, महापालिका.