रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोकाः सरसंघचालक

रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोकाः सरसंघचालक
रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोकाः सरसंघचालक

नागपूरः म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (शनिवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात दिला.

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हा इशारा दिला. याप्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री रविदास साधू संप्रदाय सोसायटीचे प्रमुख निर्मलदास महाराज उपस्थित राहणार होते. परंतु वेळेवर प्रकृती अचानक बिघडल्याने ते हजर राहू शकले नाही. त्यांचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार्यवाह भैय्याजी जोशी होते.

या विजयादशमी कार्यक्रमाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. सरसंघचालकांनी 1 तास 10 मिनिटांच्या भाषणात देशाची आर्थिक धोरण, कृषी धोरण व आंतरिक सुरक्षा, काश्‍मीर मुद्दा, गोरक्षा आदी विषयांवर सविस्तर विवेचन केले.

भाषणाच्या सुरूवातीला डॉ. भागवत यांनी मुंबईत शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्याबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. डॉ. भागवत यांनी म्यानमारमधील दहशतवादी रोहिंगण्यांना आश्रय देण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. रोहिंग्यांना म्यानमारमधून कां हाकलले, याची समीक्षा आधी व्हायला हवी. रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे सामाजिक सलोखा धोक्‍यात येईल. बांगलादेशमधून घुसखोरी सुरूच आहे. त्यांना आवरणे कठिण झाले आहे. हा धोका लक्षात घेऊनच रोहिंग्यांना वेळीच सरकारने आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले.

आर्थिक धोरणांमध्ये बदल आवश्‍यक
देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी यावेळी केले. काही दिवसांपूर्वी माजी अर्थमंत्री व भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी देशाची आर्थिक स्थिती डबघाईस जात असल्याचा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक धोरणाबाबत सरसंघचालकांनी व्यक्त केलेल्या मतांना महत्त्वाचे मानले जात आहे. केवळ मोठ्या उद्योजकांचे हित पाहणे म्हणजे विकास नसून लघु, मध्यम व कारागिरांच्या विकासाकडे लक्ष गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी आर्थिक धोरण समोर ठेऊन देशाचा सम्रग विकास होऊ शकत नाही. प्रत्येक देशाने आपले आर्थिक धोरण करण्याची आवश्‍यकता असल्याचे. कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात अनेक शेतकरी अल्प भूधारक आहे. कर्जात बुडालेला आहे. त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे.

गोरक्षा व हिंसेचा संबंध नाही
गोरक्षा व हिंसेचा संबंध जोडू नये, असे सांगून ते म्हणाले, गोरक्षेच्या नावावर हिंसा खपवून घेऊ नये. अनेक मुसलमानही गोरक्षेच्या काम करीत आहे. गोरक्षा करणारे हिंसा करू शकत नाही. यासाठी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये अनेक विस्थापित हिंदू आहे. देशाच्या फाळणीनंतर हे लोक हिंदू बनून राहण्यासाठी पाकिस्तानातून आले. त्यांना काश्‍मीरमध्ये आश्रय दिला आहे. त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांना नागरिकत्वही दिलेले नाही. त्यांना त्वरित नागरिकत्व बहाल, अशी मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com