चिनी वस्तूंविरोधात संघर्षाच्या तयारीत संघ; बहिष्कारासाठी समन्वय शाखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर : चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली. संघाच्या विविध संघटनांच्या समन्वय शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या शाखांच्या माध्यमातून चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्काराची योजना घराघरांपर्यंत पोहोचविण्याच्या रणनीतीवर आज संघाचे पदाधिकारी व शहर भाजपसह विविध संघाच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांत खल झाला.

नागपूर : चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली. संघाच्या विविध संघटनांच्या समन्वय शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या शाखांच्या माध्यमातून चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्काराची योजना घराघरांपर्यंत पोहोचविण्याच्या रणनीतीवर आज संघाचे पदाधिकारी व शहर भाजपसह विविध संघाच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांत खल झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात त्यांच्या विविध संघटनांसोबत समन्वय बैठक आयोजित केली होती. शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसह बजरंग दल, विहिंप, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया यांनी मार्गदर्शन केले. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत पाच सत्र पार पडले. या वेळी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चीनचा विरोध सावधतेने करण्याचा सल्ला संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

भारताविरोधात चीनच्या खुरापती कारवाईवर यावेळी चर्चा झाली. या वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार असून आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणामुळे लाचार असून चिनी वस्तूंना भारतात येण्यापासून रोखू शकत नाही, असे सांगितले. परंतु, चिनी वस्तूंची खरेदी रोखण्यासाठी अनेक पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले. सणासुदींच्या दिवसात मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू विक्रीसाठी येतात. या वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकूनही चीनचा विरोध करता येईल. यासाठी संघाच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घराघरापर्यंत जाऊन चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या अभियानाची माहिती द्यावी, असेही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कारासाठी विशेषतः महिलांना आवाहन करण्यात येणार आहे. धार्मिक तसेच सार्वजनिक ठिकाणीही या अभियानाची व्याप्ती वाढण्यात येणार आहे. या बैठकीत महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, भाजपचे शहर संघटनमंत्री संदीप जोशी, भोजराज डुंबे, माजी शहराध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, आमदार अनिल सोले, प्रवीण दटके, किशोर पलांदूरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम, वरिष्ठ पदाधिकारी देवेंद्र दस्तुरे, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.