हल्लीचे गायक दीड वर्षात ‘आउटडेटेड’ होतात - रूपकुमार राठोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - पूर्वी एका गायकाचे चित्रपटसृष्टीतील करिअर कमीत-कमी पंधरा वर्षांचे होते. आता चित्रपट तयार करणाऱ्यांना संगीत महत्त्वाचे वाटते, पण त्याबद्दल आस्था राहिलेली नाही. त्यामुळे हल्लीचे गायकही एक-दीड वर्षामध्ये ‘आउटडेटेड’ होतात, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध  गायक रूपकुमार राठोड यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. मोहम्मद रफी पुरस्कार स्वीकारण्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जुन्या आणि नव्याची तुलना कायमच होत राहील. पण, पूर्वीच्या काळातही वाईट गाणे यायचे  आणि आजही येतात. आज प्रमाण वाढले आहे एवढेच, असे सांगतानाच गाण्यातील शब्द आणि अर्थाची जाण असणारे कमी आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘सरफरोश चित्रपटाचे ‘जिंदगी मौत ना बन जाए’ हे गीत सुरुवातीला असे नव्हतेच. ‘धुल तो धुल है’ वगैरे सारखे शब्द त्यात होते. माझी नाराजी दिग्दर्शकाला कळवली. त्यानंतर मी स्वतः इसरार अन्सारी यांच्याकडून ते लिहून घेतले आणि पुढे ते लोकप्रियही झाले. मात्र, त्या काळात गायक स्वतः गाण्यातील शब्दांबाबत भान राखायचे. आज काय परिस्थिती आहे, हे ‘सलमान का फॅन’  या गाण्यातून स्पष्ट होते,’ असेही ते म्हणाले. रिॲलिटी शो बंद व्हायला हवेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ते म्हणाले, ‘रिॲलिटी शोमुळे यशाची पायरी चढणे सोपे झाले आहे. पण, हे यश अल्पकाळापुरते असते. माझ्याकडे पालक येतात आणि मुलाला किंवा मुलीला ऑडिशनसाठी दोन दिवसांत तयार करायला सांगतात. असे दोन दिवसांत गायक तयार होत नसतात, हे सांगून थकलोय. या शोजमुळे कलावंतांच्या आयुष्यातील संघर्ष संपला. संगीताचा गंध नसलेलाही गाणं गातो. रिॲलिटी शोमुळे कलावंतांचे हेअर स्टाइल, पेहराव वगैरे बदलतात, मात्र आवाजाचे काय?’ रिॲलिटी शोजचा मुलांवर वाईट परिणाम होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

‘रिमिक्‍स चांगले, व्हिडिओ अश्‍लील’
‘जुन्या गाण्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रिमिक्‍सचा मार्ग चांगला आहे. ‘कांटा लगा’ हे लतादीदींनी गायलेले गाणे कदाचित नव्या पिढीला माहिती नसेल, पण रिमिक्‍समुळे ते लोकांपर्यंत पोहोचले. दुर्दैवाने चांगल्या रिमिक्‍सचे व्हिडिओ अश्‍लील असल्यामुळे त्याचे पावित्र्य राहात  नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: nagpur news Rupkumar Rathod singer