संमेलनाच्या उद्‌घाटनाला पंतप्रधानांना बोलावणार ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पंतप्रधान मोदी यांना संमेलनासाठी बोलावणार आहोत. त्यांनी निमंत्रण स्वीकारून हजेरी लावावी, यासाठी विशेष प्रयत्नही करू. 
- दिलीप खोपकर, अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय परिषद बडोदा 

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी आयोजक संस्था प्रयत्न करणार आहे. मुख्य म्हणजे दिल्लीत संमेलन होण्याची चिन्हे असतानादेखील अनेकांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीचा अंदाज लावला होता. मात्र, बडोद्यात त्याची शक्‍यता अधिक आहे. 

स्वतंत्र भारतात बडोद्यात होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे नरेंद्र मोदीदेखील निमंत्रण आनंदाने स्वीकारतील, अशी आयोजकांना आशा आहे. पंतप्रधानांनी संमेलनाला उपस्थिती लावली तर संमेलनाच्या व्यासपीठावर येणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान असतील, हे विशेष. सध्या जेमतेम संमेलनस्थळाची घोषणा झाली आहे, त्यामुळे आयोजक तयारीला लागले आहेत. यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस गुजरातमधील विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता असल्याने संमेलन जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता, निवडणुका आणि निकालानंतरच संमेलन होईल, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. संमेलनाध्यक्षपदाच्या संदर्भातील आयोजकांचा कल आणि संमेलनाच्या तारखा या दोन गोष्टींवरच यजमानांचे लक्ष लागले आहे.