राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून मानापमान नाट्य 

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून मानापमान नाट्य 

नागपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कामठीतील ड्रॅगन पॅलेस येथील विपश्‍यना केंद्राच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना निमंत्रित न केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने विशेषाधिकाराचे हनन झाल्याची तक्रार खासदार तुमाने लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहेत. 

विपश्‍यना केंद्राचे उद्‌घाटन आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आयोजित केला होता. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार तेथील कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार कृपाल तुमाने यांना मिळणे आवश्‍यक होते. उद्‌घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेवर सर्वांचे छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले होते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने विपश्‍यना केंद्राच्या उभारणीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. उद्‌घाटन कार्यक्रमाचे आयोजकसुद्धा सामाजिक न्याय विभाग होता. असे असताना याच मतदारसंघाच्या खासदारांना निमंत्रित करण्याचा व निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव प्रकाशित करण्याचा साधा शिष्टाचार पाळण्यात आला नाही. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेच्या खच्चीकरणाचा भाजपतर्फे सतत प्रयत्न केला जात आहे. खासदारांच्या निधीतून होणाऱ्या कार्यक्रमाचे श्रेयसुद्धा भाजपचेच नेते लाटतात. विकासकामांच्या फलकांवरसुद्धा त्यांचे नाव टाकत नसल्याच्या शिवसेनेच्या तक्रारी आहेत. पूर्व विदर्भात तुमाने शिवसेनेचे एकमेव खासदार आहेत. त्यांचाही आदर भाजपच्या वतीने केला जात नसल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. 

लोकसभाध्यक्षांकडे तक्रार करणार - खासदार तुमाने 
या संदर्भात खासदार कृपाल तुमाने यांच्याशी संपर्क साधला असता निमंत्रण दिले नसल्याने आपण कार्यक्रमाला गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. याची तक्रार आपण लोकसभाध्यक्षांकडे करू. याशिवाय शासकीय प्रोटोकॉलचा अवमान केल्याने याचिकासुद्धा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com