पंक्‍चरवाल्याचा पोऱ्या ठरला यशाचे ‘प्रतीक’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - सिरसपेठ वस्तीमध्ये पंक्‍चर दुरुस्त करणाऱ्याच्या घरी जन्माला आलेला पोरगा एक दिवस वस्तीचे नाव चमकवेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र, प्रतीक श्रीधर कोंतमवार याने ही किमया साधली. दहावीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळवणारा वस्तीतला ‘छोटू’ आज खऱ्या अर्थाने यशाचे ‘प्रतीक’ ठरला. आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका व रोहिणी राऊत या भगिनींमुळे सिरसपेठने काही वर्षांपूर्वी संपूर्ण माध्यमविश्‍वाचे लक्ष वेधले होते. 

त्याच वस्तीत मंगळवारी (ता. १३) माध्यमांचे प्रतिनिधी प्रतीकचे घर शोधत होते. लहानशा झोपडीत कोंतमवार कुटुंबीय राहतात. प्रतीकच्या वडिलांचे रेशीमबाग मैदानाजवळ पंक्‍चर दुरुस्त करण्याचे दुकान आहे. आई सुनीता काही वर्षांपूर्वीपर्यंत दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करायच्या. मात्र, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता यावे, यासाठी त्यांनी आता वस्तीतच गोळ्या-चॉकलेटचे दुकान सुरू केले. लहानपणापासूनच अभ्यासू मुलगा अशी संपूर्ण वस्तीमध्ये ओळख असलेला प्रतीक दररोज पहाटे पाचला उठून अभ्यास करायचा आणि रात्री बारापर्यंत त्याचा अभ्यास चालायचा. प्रतीकने अभियंता होण्याची इच्छा व्यक्त केली असून, तो जेईईची तयारीही करणार आहे. प्रतीकच्या वडिलांचे भावूक डोळे बरेच काही बोलून गेले. मात्र, मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्‍यक आर्थिक बांधणीची चिंताही झळकत होती.

वस्ती धावून येणार मदतीला
आजवर वस्तीने कोंतमवार कुटुंबीयाला वेळोवेळी मदत केली आहे. प्रतीकने दहावीमध्ये मिळविलेल्या यशाचे कौतुक वस्तीतील नागरिकांना असून, त्याचे स्वप्न साकारण्यासाठी वस्ती आर्थिक मदत करणार आहे. याबाबत नगरसेवक नागेश सहारे तसेच काही क्रीडा संघटनांकडूनदेखील आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोंतमवार कुटुंबीयांचे हितचिंतक ॲडविन ॲन्थोनी यांनी सांगितले.