एसटी कामगारांचा घोषित संप बेकायदेशीर - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणे शक्‍य नाही. अशा परिस्थितीत कामगार संघटनांनी घोषित केलेला संप बेकायदेशीर असून, संघटनेलाही त्याची जाणीव असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नागपूर विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिवशाही बससेवेचा शुभारंभ आज दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पश्‍चात ते पत्रकारांशी बोलत होते. एसटी महामंडळ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने ऐन दिवाळीत बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, की एसटीचे उत्पन्न 7 हजार कोटींच्या घरात असून, खर्च 12 हजार कोटींचा आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. अशा स्थितीत तोट्यात असलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही तो देता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी ही आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. पण, संघटनांनी अशा प्रकारे आठमुठे धोरण स्वीकारून कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये. संपाची घोषणा केली असली तरी त्यांनी संपावर जाऊ नये, अशी अपेक्षा रावते यांनी व्यक्त केली.