चिमुकल्याच्या आतड्यातून काढला खिळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सर चहा घ्या...
खिळा आतड्यांमध्ये रुतून जखम झाली असती तर जीवाला धोका होता. ही बाब डॉक्‍टरांनी हिमांशूच्या वडिलांना सांगितली. त्याचे आईवडील दोघेही रडत होते. खिळा काढला आणि हिमांशू ठीक आहे, असे समजातच हिमांशूच्या वडिलांनी भारावलेल्या अंतःकरणाने डॉ. गुप्ता यांचा हात धरला. सर... तुम्हीच माझ्यासाठी देव.... चहा पिता का सर... असे म्हणत हातील रुमाल डोळ्यांच्या कडांना लावला.

नागपूर -अंगणात खेळताना चिमुकल्याने कधी खिळा गिळला कळले नाही. अज्ञानातून शेजाऱ्यांनी केळ खाऊ घातले. यामुळे खिळा आतड्यांच्या मुखामध्ये जाऊन फसला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलध्ये वेळीच उपचार मिळाल्यामुळे हिमांशूला जिवदान मिळाले. दोनवेळा दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेतून त्याचा जीव वाचला.

मुळचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्‍यातल्या बोपेश्‍वर येथील शैलेश क्षीरसागर यांचा सात वर्षांचा मुलगा हिमांशूने गुरुवारी खिळा गिळला. पोटात काहीतरी गेल्याचे त्याने काकाला सांगितले. काकाने ही बाब शैलेशला सांगितली. शैलेश यांनी मध्यरात्री मेडिकल गाठले. आकस्मिक विभागातून सुपरमध्ये रेफर केले. सुपरमध्ये एक्‍स-रेत खिळा ‘ड्युडनल थर्ड पार्ट’ अर्थात लहान आतड्यांना सुरुवात होते तेथे फसला दिसला.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खिळा अणुकुचिदार असल्याने बाहेर काढताना रक्तस्राव होण्याची भीती असल्यामुळे सुरवातीला आतड्यात फसलेला खिळा शुक्रवारी शस्त्रक्रियेतून पोटापर्यंत आणला. त्यानंतर शनिवारी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात आतड्यातून दुर्बिण टाकली. दुपारी १२.३० च्या सुमारास ४ इंच लांबीचा खिळा दुखापत न करता बाहेर काढला.

दोन्ही शस्त्रक्रिया साध्या दुर्बिणीद्वारे शक्‍य नव्हत्या. यासाठी ‘डबल बलून इंडोस्कोपी’चा आधार घेतला. ही दुर्बिण अचुकतेने काम करते. पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत हे उपकरण मिळाले. यामुळे गरीब चिमुकल्यांचा जीव वाचवू शकलो. गरिबांना माफक दरात उपचार शक्‍य झाले.
- डॉ. सुधीर गुप्ता, विभागप्रमुख, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, सुपर स्पेशालिटी.