प्रस्ताव न पाठविल्याने हुकली संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी प्रस्ताव न पाठविल्याने यावर्षी एकाही स्पर्धेचे यजमानपद मिळाले नाही. आता विद्यापीठ पश्‍चिम विभाग क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार आहे.

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी प्रस्ताव न पाठविल्याने यावर्षी एकाही स्पर्धेचे यजमानपद मिळाले नाही. आता विद्यापीठ पश्‍चिम विभाग क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार आहे.

‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’तर्फे (एआययू) नुकतेच २०१७-१८ या सत्रातील विविध आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यात नागपूर विद्यापीठाच्या वाट्याला एकाही स्पर्धेचे यजमानपद आले नाही. यासंदर्भात क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. कल्पना जाधव यांना विचारले असता त्या म्हणाल्या, स्पर्धांच्या यजमानपदांसाठीचा प्रस्ताव मार्चपूर्वीच पाठविणे आवश्‍यक होते. प्रभारी संचालक रवींद्र पुंडलिक यांनी प्रस्तावच पाठविला नाही. तारीख गेल्यानंतर माझी संचालकपदी नियुक्‍ती झाली. त्यामुळे मी काहीही करू शकले नाही. अखिल भारतीय स्पर्धेची संधी हुकली असली तरी, विद्यापीठ पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठ स्पर्धांच्या यजमानपदासाठी निश्‍चितच प्रयत्न करणार  आहे. यासंदर्भात लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर विद्यापीठाला गतवर्षी पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. परंतु, विद्यापीठाने शेवटच्या क्षणी आयोजनाबाबत असमर्थता व्यक्‍त केल्याने ती स्पर्धा नांदेडच्या स्वामी रामानंद  तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे गेली होती. नागपूर विद्यापीठाने यापूर्वी २०१५-१६ मध्ये पुरुषांच्या पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. याशिवाय पश्‍चिम विभाग बास्केटबॉल स्पर्धेचेही यजमानपद भूषविले आहे.

विद्यापीठ अद्याप आशावादी
अद्याप महिलांच्या पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठ क्रिकेट, हॅण्डबॉल, हॉकी, कबड्डी आणि टेनिस स्पर्धा तसेच पुरुषांच्या क्रिकेट व हॉकी स्पर्धांच्या यजमानपदांचे वाटप शिल्लक असून, यातील किमान एक तरी स्पर्धा नागपुरात व्हावी असा प्रयत्न राहणार आहे. पश्‍चिम विभाग स्पर्धेचे यजमानपद विद्यापीठाला मिळेल की नाही, हे येणारा काळच सांगेल. तथापि अखिल भारतीय स्पर्धेचे यजमानपद हुकल्याने दर्जेदार सोयीसुविधा असलेल्या नागपूर विद्यापीठाचे खेळाडू मात्र चांगल्या संधीपासून वंचित राहिले आहे, हेही तितकेच खरे, असे डॉ. कल्पना जाधव म्हणाल्या.