वाल्मीकी समाजाचे प्रश्‍न सोडविणार - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - वाल्मीकी समाजाला विविध क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वाल्मीकी समाजासमोरचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

वाल्मीकी फाउंडेशनतर्फे रविवारी जवाहर विद्यार्थिगृहात आयोजित वाल्मीकी समाज युवक-युवती परिचय व पारिवारिक संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार डॉ. परिणय फुके, उमेशनाथ महाराज, रामू पवार, गिरीश पांडव, रूपा राय, नगरसेवक विजय चुटेले, संजय नाहर, अध्यक्ष सतीश डागोर, फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. या वेळी वाल्मीकी फाउंडेशनच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

वाल्मीकी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याने नव्या पिढीत आत्मविश्‍वास दिसून येत आहे. काळानुरूप विवाह समारंभावरील होणारा मोठा खर्च टाळण्याची आवश्‍यकता आहे. हा खर्च शिक्षणासाठी वापरल्यास ते अधिक योग्य ठरेल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. युवक-युवती परिचय मेळाव्यात एअर होस्टेस, डॉक्‍टर, प्रशासकीय सेवा, तसेच अन्य विविध क्षेत्रांत कार्यरत युवक-युवतींनी आपला व कार्यक्षेत्राचा परिचय दिला.