अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - राज्यातील पाच प्रमुख शहरांमध्ये यंदापासून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून (ता. २९) शाळांमध्ये माहिती पुस्तिकेची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक  नामदेव जरग यांनी दिली.

नागपूर - राज्यातील पाच प्रमुख शहरांमध्ये यंदापासून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून (ता. २९) शाळांमध्ये माहिती पुस्तिकेची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक  नामदेव जरग यांनी दिली.

शिक्षण विभागातर्फे यंदा राज्यातील काही प्रमुख शहरांत ऑनलाइन अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. यात नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद शहरांचा समावेश आहे. दहावीचा निकाल साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. त्यापूर्वीच ज्या शाळेतून विद्यार्थ्याने परीक्षा दिली, त्याच शाळेतून विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी विशिष्ट संकेतस्थळ दिले आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ स्वतंत्र केंद्र तयार करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेश अर्जाचे दोन भाग केले असून, पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे. २५ मेपासून पुढे काही दिवस पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेश अर्जाचा केवळ एक भाग भरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. दुसऱ्या भागात महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरल्यानंतरच संबंधित महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. या वेळी मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रक्रियेसंदर्भात उपसंचालकांना निर्देश दिले. याशिवाय पालकांच्या तक्रारीचे योग्य समाधान करण्याचे आवाहन केले. दहावीच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार असून, त्यासाठी गुरुवारी उपसंचालकांची बैठक बोलाविली होती.

खासगी शिकवणींवर नियंत्रण
अकरावी प्रवेशासाठी सुरू असणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद केल्यामुळे खासगी शिकवणी वर्गासोबत ‘टायअप’ करून दुकानदारी चालविणाऱ्या महाविद्यालयांना चांगलाच धक्का बसला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे महाविद्यालयांमधील प्रवेश हे आता ऑनलाइन होणार असल्याने बड्या महाविद्यालयांची दादागिरीही थांबणार, हे विशेष.

सर्व्हरची समस्या येणार नाही
कुठलीही ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्यावर सर्वांत मोठी समस्या ही सर्व्हरची असते. मात्र, या समस्येवर बरेच मंथन झाले असून, यंदाच्या प्रक्रियेत ती समस्या येणार नसून प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे संचालक नामदेव जरग यांनी सांगितले.